नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून येणाऱ्या नागरिकांविषयी कोणतीही खबरदारी बाळगली जात नाही. "आओ जाओ घर तुम्हारा"सारखी परिस्थिती सध्या नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. असुरक्षित प्रवासामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे.


नांदेड जिल्ह्यात सध्या 28 हजार 520 कोरोना रुग्ण असून 624 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या पंधरा दिवसात नांदेड महापालिका क्षेत्रात जवळपास 3 हजार कोरोना रुग्ण संख्या आहे, जी जिल्ह्याच्या तुलनेत 70 टक्के इतकी आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यात नांदेड येथील प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना प्रवेशास बंदी आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात मात्र कोणत्याही जिल्ह्यातून सहज ये-जा करता येत आहे. 


नांदेड जिल्ह्याशेजारी विदर्भ, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक सीमा आहेत. नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात आणि तेलंगाणा, कर्नाटक या राज्यात दिवसभरात जवळपास 300 बस ये-जा करतात. त्यामुळे बसस्थानकात सुद्धा कोरोना अँटिजेन कक्ष बसवण्यात यावा अशी मागणी नांदेडच्या बस व्यवस्थापकांनी केली आहे. कारण दररोज या भागातून हजारो वाहने आणि प्रवाशी जिल्ह्यात प्रवेश करतात. 


तसंच लग्नसराई असल्यामुळे बसस्थानक, रेल्वे स्थानकावर पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्याची संख्या जास्त आहे. नांदेड रेल्वे स्थानकातून दररोज 20 रेल्वे गाड्या ये-जा करतात. त्यामुळे दररोज हजारो प्रवासी नांदेड येथे ये-जा करतात. परंतु तिथेही कोरोना अँटिजेन तपासणी कक्ष बसवण्यात आला नाही आहे. याविषयी रेल्वे स्टेशन मास्टर श्री कालीचारण यांच्याशी सवांद साधला असता हे काम आमचे नसून महापालिकेचे आहे असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले. याठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये कोणतेही सामाजिक अंतर आणि प्रवाशांच्या तपासण्या होत नसतील तर कोरोनाची आकडेवारी कशी कमी होणार हा मोठा प्रश्न आहे. तसेच भविष्यात याप्रकारे सीमावर्ती भागातून येणाऱ्या नागरिकांविषयी असे बेजबाबदार वागल्यास येत्या काळात नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा मोठा विस्फोट होईल हे नाकारता येत नाही. 


सध्या जिल्ह्यात फक्त दोन ठिकाणी अँटिजेन तपासणी नाके असून तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या सीमेवर कोणत्याही प्रवाशांची तपासणी होत नाही. त्यामुळे राज्यात हॉटस्पॉट ठरणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कशी कमी होणार हा मोठा प्रश्न आहे.