सांगली : कोरोनाची भीती गेली, आता तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा तातडीने भरवा. यासाठी कुस्तीगीर परिषदेने पाऊले उचलावीत, अशी मागणी राज्यभरातील पैलवान तसचं कुस्तीप्रेमींकडून होत आहे. कोरोनामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच कुस्तीलाही फटका बसला. परंतु आता महाराष्ट्र अनलॉक झाला असताना महाराष्ट्र केसरी स्पर्धा तातडीने भरवण्याची मागणी केली जात आहे.
दोन वर्षापूर्वी कोरोनाचा देशात प्रसार वाढला आणि सर्वच क्षेत्रावर निर्बंधाची मालिका सुरु झाली. महाराष्ट्राचे संस्कृती असलेले कुस्ती क्षेत्रही यातून सुटलं नाही. दोन-अडीच वर्षांमध्ये कुस्तीचे एकही मैदान भरले नाही. याशिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्या स्पर्धा देखील होऊ शकल्या नाहीत. आता कोरोनाची भीती संपली आहे. सर्व निर्बंधातून राज्य मुक्त झाले आहे. आता तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा तातडीने भरवा, अशी माहणी महाराष्ट्रभरातील पैलवान-कुस्ती प्रेमी करत आहेत. कुस्तीगीर परिषदेने याबाबतीत पाऊले उचलावीत, अन्यथा कुस्तीगीर परिषदेलाच अवकळा आली आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असंही कुस्तीप्रेमींचं म्हणणं आहे.
कोरोनाचा देशात जसा प्रसार झाला तसा कुस्ती मैदाने भरलीच नाहीत. दोन-अडीच वर्षात अनेक पैलवानांवर उपासमारीची वेळ आली. कुणी पैलवानकी सोडून पोटासाठी कामावर जाऊ लागले तर कुण्या पैलवानाने व्यवसाय सुरु केला. यामुळे कुस्ती क्षेत्राला कधी नव्हे इतकी अवकळा या कोरोनाच्या काळात आली. पण ही मरगळ झटकून कधी टाकणार? कोरोनाची भीती आता संपली आहे तरी देखील कुस्तीगीर परिषद कुस्ती मैदान पुन्हा सुरु व्हावीत, महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा सुरु व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे का? की कुस्तीगीर परिषदेलाच अवकळा आली आहे, असा प्रश्न पैलवान आणि कुस्तीप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
कोरोना काळात मैदाने होत नसल्याने अनेकांनी पैलवानकी बंद करत व्यवसाय सुरु केले. आमची घरची परिस्थिती जरा बरी म्हणून आम्ही अजूनही कुस्ती मैदान पुन्हा सुरु होतील, पुन्हा कुस्तीला चांगले दिवस येतील, या आशेवर आम्ही तालमीत सराव करत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा कुस्ती मैदाने, महाराष्ट्र केसरी स्पर्धा तातडीने भरवल्या जाव्यात अशी पैलवान मागणी करत आहेत.
कोरोनाच्या संकटातून आणि निर्बंधातून आता आपली मुक्तता होत असताना कुस्ती क्षेत्राला देखील निर्बंधातून मुक्त करण्याची गरज आहे.