सोलापूर : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक गरीब, भिक्षूक, बेघर यांचे मोठे हाल होत आहेत. अनेकांना दोन वेळेचे जेवण देखील वेळेवर मिळत नाही. अशा कठीण काळात सोलापुरातील अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते पुढे येताना पाहायला मिळत आहे. सोलापुरात काँग्रेसतर्फे देखील एका स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 'मदतीचा एक घास' या उपक्रमाअंतर्गत लॉकडाऊनच्या काळात सोलापूर शहरातील गरीब, बेघर, झोपडपट्टीत राहणारे गरजू आणि रस्त्यावर भाकरीसाठी वणवण फिरणारे भिक्षूक यांच्यासाठी जेवणाची सोय काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. 


प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी रोजचे जेवण बनत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून अधिकच्या 10 ते 15 पोळी तसेच काही भाजी बनवायची, अशी संकल्पना प्रणिती शिंदे यांनी मांडली होती. यामध्ये स्वत: पुढाकार घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वत: देखील पोळ्या लाटल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वत: पोळ्या तयार करुन आपल्या घरापासून उपक्रमाची सुरुवात केल्याने कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी होत आहेत. 




सोलापूर शहरातील विविध झोपडपट्ट्या, कामगार वस्ती तसेच रस्त्यावरील गरजूंना या जेवणाचे वाटप काँग्रेसचे कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत. दररोज 1500 ते 2 हजार पोळी गरजूंना वाटप करण्याचे प्रयत्न काँग्रेसतर्फे केले जात आहेत. तर लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशिवाय समाजातील सर्वच नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. 


जजय हिंद फूड बँक, रोटी बँक, रॉबिनहूड आर्मी, संभव फाउंडेशनतर्फे दररोज शेकडो लोकांना मोफत जेवण




रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणासाठी मोठे हाल होत असतात. कोरोनाच्या काळात तर लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद आहेत. हीच गरज ओळखून सोलापुरातील अनेक सामाजिक संघटना जेवणाची सोय करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. कोरोनाची भीती न बाळगता जय हिंद फूड बँक, रोटी बँक या संघटनांच्यावतीने रुग्णालय परिसरात तसेच शहरातील विविध भागात मोफत जेवणाची सोय करण्यात येत आहे. तर रॉबिनहूड आर्मीतर्फे कुष्ठरोग वसाहत, कामगार वसाहत या ठिकाणी मोफत जेवणाची सोय केली जात आहे. मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या संभव फाउंडेशनतर्फे देखील रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण, भिक्षुक यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जात आहे. दररोज शेकडो लोकांना मोफत जेवण या संस्थांच्या प्रयत्नांमुळे मिळत आहे.




एमआयएमच्या फारुख शाब्दी यांच्यावतीने 10 हजार कुटुंबाना अन्नधान्य वाटप




लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद आहेत. त्यामुळे घरात किराणा भरण्यासाठी देखील गरीब कुटुंबांकडे पैसे नाहीत. अशात एमआयएमचे नेते तसेच उद्योजक फारुख शाब्दी यांच्यातर्फे तब्बल 10 हजार कुटुंबाना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक कीटमध्ये 5 किलो तांदूळ, पीठ, 1 किलो तेल, 1 किलो दाळ अशा पद्धतीचे साहित्य करण्यात आले आहे. मागील लाटेत देखील शाब्दी यांच्यावतीने 10 हजाराहून अधिक कुटुंबाना अन्नधान्य वितरीत करण्यात आले होते. तसेच सोलापुरातील काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, काँग्रेसचे कार्यकर्ते रॉकी बंगाळे यांच्यावतीने देखील त्यांच्या प्रभागातील गरजुंना अन्नधान्य वितरित करण्यात आले. प्रभागातील जवळपास पाचशे ते सातशे कुटुंबाना किराणा माल, अत्यावश्यक साहित्य देण्यात आले.