मुंबई : एप्रिल अखेरीस महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी येत्या २८ एप्रिलनंतर मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची तारीख निश्चित झाली नसली तरी महाराष्ट्रातील राजकारणाकरता हा दौरा विशेष महत्त्वाचा असणार आहे. सोबतच, याच वेळी मुंबईत गैरभाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठकही मुंबईत होणार आहे. या बैठकीतही राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
एप्रिल अखेर आणि मे महिन्याची सुरुवात मुंबई आणि महाराष्ट्रात तापमानासोबतच राजकीय तापमानाचा पारा वाढवणारी ठरणार आहे. एकीकडे गैरभाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याकरता गैरभाजपशासित राज्यातील 11 मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचं आदरातिथ्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. तर दुसरीकडे याच वेळी कॉंग्रेसचे राहुल गांधीही मुंबई दौ-यावर येत आहेत.
ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही अशा राज्यांमधील 11 मुख्यमंत्री आणि भाजपा विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात लवकरच एक बैठक मुंबईत आयोजित केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करतील असही राऊत यांनी सांगितले आहे.
देशात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु असतांना महाराष्ट्रात भाजपविरोधातली महाविकास आघाडीची तीन पक्षांची मोट कशी मजबूत राहील याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. याकरता महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील किमान समान कार्यक्रम, सरकारमधील समन्वय यासाठी राहुल गांधींचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे
देशातली बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न यासह विविध मुद्द्यांवर गैरभाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री मंथन करतील. यावेळी महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सत्तेचा भाजपविरोधी प्रयोगाचे दाखलेही दिले जातील. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या मा-याला तोंड देतांना भाजपविरोधी पक्षांची मोट बांधली जातेय का? हे येणारा काळच सांगेल