Sambhajiraje Chhatrapati : मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात आलेल्या छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांना मुख्यमंत्र्यांनी भेट टाळली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजी राजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी मंत्रालयात (Mantralaya) दाखल झाले होते. मुख्यमंत्री दालनाबाहेर जवळपास दीड तास थांबल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली नाही. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले.


मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालयात आले होते. सर्वात आधी त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली.  या भेटीत त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. 


मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले पण समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे मात्र समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना भेटण्यास वेळ नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. 


दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री यांची वेळ घेतली नव्हती. ते सचिवांना भेटायला आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्वनियोजन बैठक असल्याने त्यांना भेटता आले नाही. ते निघून गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि संभाजीराजे छत्रपती फोनवरून बोलणं झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


संभाजीराजे छत्रपतींवर नाराजी


राज्यातील मराठा समाजाच्या प्रश्नावर काम करणारा एक गट याआधीच संभाजीराजे छत्रपती यांच्यावर नाराज  असल्याचे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबईत बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत संभाजीराजे छत्रपती यांनी इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोलून दिले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. 


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक सुरू होताच छत्रपती संभाजीराजेंनी बैठकीत कोणीही बोलू नका, अन्यथा मी बैठक सोडून निघून जाईल असे सांगून प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत केला होता. तर याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना संभाजीराजे पाहायला मिळाले. आम्ही छत्रपतींच्या गादीचा सन्मान करतो, मात्र संभाजीराजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही अशी भूमिका सुद्धा यावेळी मराठा समन्वयकांनी मांडली.