Chhatrapati Sambhajinagar News : आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच रब्बीतून काही तरी हातात येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या तीन दिवसात राज्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक नुकसान गव्हाच्या पिकाचे झाले आहे. दरम्यान गव्हाच्या पिकाचे झालेलं नुकसान पाहून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील ही घटना आहे. 


राज्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबता थांबायला तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील शेतकरी आत्महत्या वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अवकाळी पावसाने गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याने गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकरी अशोक भिका शिरसाट यांनी आत्महत्या केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक शिरसाट यांच्या शेतात यावर्षी कापूस पिकाची लागवड करण्यात आली होती. दरम्यान कापूस वेचणीला आल्यावर त्याला भाव नसल्याने त्यांनी घरातच कापूस ठेवला होता. या काळात त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे याची त्यांना चिंता लागली होती. अशातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. झालेल्या नुकसानीचा त्यांनी धसका घेतला होता. 


लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.


दरम्यान घरी आल्यावर गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत ते चिंतेत असायचे. त्यामुळे त्यांच्या आईने आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ते चिंतेत होते. आधीच कापसाला भाव नाही आणि त्यात गव्हाचे झालेल्या नुकसानीच्या चिंतेत त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तसेच 8 मार्च रोजी घरात कोणालाही काहीही न सांगता शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी अशोक शिरसाट यांचे भाऊ शेतात गेल्यावर ही घटना उघडकीस आली. 


कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या! 


दरम्यान मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकापाठोपाठ शेतकरी आत्महत्या होत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील एकाच गावात दोन शेतकऱ्यांनी एकापाठोपाठ एक गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली समोर आली होती. सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना उघडकीस आली होती. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46 वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या