Maharashtra Budget 2023: आज शिंदे-फडणवीस सरकारनं (Maharashtra Government) आपला पहिला अर्थसंकल्प (Budget 2023) विधीमंडळात सादर करताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. राज्यातील सर्व समाजातील लोकांसाठी आजच्या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्यात. विविध समाजातील तरुणांसाठीही मोठ्या तरतुदींची घोषणा करण्यात आली. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था  (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ,  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ,  महिला आर्थिक विकास महामंडळ,  संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या सर्व महामंडळांकरता पुरेशी तरतूद करण्यात आलेली असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 






लिंगायत समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगार आणि नवोद्योजकांना स्वयं उद्योग अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं जाणार आहे. तसेच, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं जाणार असल्याची घोषणाही फडणवीसांनी अर्थसंकल्पात केली आहे. 


वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळअंतर्गत स्थापना करण्यात येईल. ही महामंडळे विविध कल्याणकारी योजना राबवतील त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल देण्यात येईल, अशी तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हा पहिला अर्थसंकल्प. अवकाळी पाऊस, नापिकी आणि शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, बजेटमध्ये बळीराजासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आला आहे. तसेच, महिलांसाठीही अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रत्येक समाजासाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 


राज्यभरातील स्मारकांसाठी महत्त्वाच्या तरतूदी 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये
स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये
विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी
स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये


महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास
 
श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये
भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये
श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये
श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये
श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये
श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर : 6 कोटी रुपये
श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरण स्वातंत्र्यसमराचे अंतर्गतही काही तरतूदी करण्यात आल्या आहेत. 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक
विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत; फडणवीसांची मोठी घोषणा