Chhatrapati Sambhajinagar Accident News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात एका दुचाकीस्वाराला वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने उडवल्याची घटना समोर आली आहे. अचानक डुक्कर आडवे आल्याने अपघात (Accident) होऊन रोडवर पडलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव येणाऱ्या वाळूने भरलेल्या हायवाने चिरडल्याची भयंकर घटना आज (10 मार्च)  रोजी सकाळी 11  वाजेच्या सुमारास घडली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील एनआरबी चौकात हा अपघात झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रल्हाद पुनाजी बारसे (वय 52 रा. एमआयडीसी परिसर) असे अपघातात ठार (Death) झालेल्या इसमाचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की,  प्रल्हाद बोरसे हे हॉटेल व्यावसायिक आहे. मात्र कोरोना काळात त्यांनी हॉटेल बंद केले. उदरनिर्वासाठी त्यांनी एका कंपनीत काम सुरु केले. दरम्यान आज सकाळी ते वडगाव कोल्हाटी वरून परतले होते. याचवेळी एनआरबी चौकात आल्यावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक डुक्कर आल्याने त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. ज्यात दुचाकीवरून घसरून ते रस्त्यावर पडले. तेवढ्यात पाठीमागून भरधाव आलेल्या वाळूने भरलेल्या हायवाने त्यांना चिरडले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 


हायवावर नंबर नसल्याने अनेक प्रश्न 


दरम्यान अपघात घडला त्यावेळी रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे अपघातानंतर रस्त्यावरच वाहने थांबल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तर अपघात करणारा हायवा विना नंबरचा असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी यांनी केला आहे. तर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली, तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवले. विशेष म्हणजे धडक दिलेल्या हायवावर नंबर नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


हायवावर नियंत्रण कोणाचे? 


दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात सद्या अनधिकृत वाळू उपसा जोरात सुरु आहे. त्यामुळे चोरीच्या मार्गाने वाळू वाहतूक करणारे वाहने प्रचंड वेगाने रस्त्यावर धावतात. विशेष म्हणजे वाळूज आणि परिसरात भरधाव वेगाने ट्रक, ट्रॅक्टर सह हायवा दिवस आणि रात्र वाळूची वाहतूक करीत असतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. विशेष म्हणजे महसूल तसेच पोलीस प्रशासनाकडून कोणतेही कारवाई न करता, या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, पत्नीसह चार महिन्यांच्या बाळाला घेऊन गेल्याने होता तणावात