Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहराला (Chhatrapati Sambhaji Nagar City) पाणीपुरवठा (Water Supply) करणारी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली आहे. छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील गेवराईजवळील अलाना कंपनीसमोर असलेली जलवाहिनी फुटली असून, मोठ्याप्रमाणावर पाणी वाहून जात आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरु असून, यावेळी काम करताना पोकलाईनचा धक्का लागल्याने जलवाहिनी फुटली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन तासांपासून पाणी रस्त्यावर वाहून जात असून, आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत. 


सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने छत्रपती संभाजीनगरला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद पडताना पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पाणीपुरवठा सुरळीत सुरु असतानाच आज पुन्हा जलवाहिनी फुटली आहे. जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पैठण महामार्गावरील गेवराईजवळील अलाना कंपनीसमोर फुटली. त्यामुळे पाण्याचे फवारे रस्त्यावर उडत होते. मात्र रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या पोकलॅनच्या मदतीने पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान गेल्या दोन तासांपासून पाणी फुटलेल्या जलवाहिनीतून रस्त्यावर वाया जात आहे. तर याबाबत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला माहिती देण्यात आली असून, फारोला जलशुद्धीकरण केंद्रावरुन पाणी बंद करुन जलवाहिनी जोडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. 


पाणीपुरवठा विस्कळीत होणार...


गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी पाणीपुरवठा विस्कळीत होत असताना, आता पुन्हा मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे आता जलवाहिनी जोडेपर्यंत ती जलवाहिनी फारोला जलशुद्धीकरण केंद्रापासून पुढे बंद राहणार आहे. त्यामुळे त्या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तर महानगरपालिकेच्या पथकाकडून जलवाहिनी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र जलवाहिनीमधील पाणी संपेपर्यंत काम सुरु करता येणार नाही. त्यामुळे जलवाहिनी जोडण्यासाठी किती वेळ लागणार आणि पाणीपुरवठा पुन्हा कधी सुरळीत होईल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


उन्हाळ्यात पाणीचे नियोजन करावे लागणार...


गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्न कायम आहे. उन्हाळा लागल्यावर तर परिस्थिती आणखीच गंभीर होते. अनेक भागात 10-10 दिवस नळाला पाणी येत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे आता नागरिकांना उन्हाळ्यात पाणीचे नियोजन करावे लागणार आहे. विशेष म्हणजे पाण्याची वाढीव मागणी पाहता महानगरपालिका काय प्रयत्न करते हे देखील पाहणं महत्वाचे ठरणार आहे. पण असे असले तरीही प्रत्येकवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावाच लागतो आणि यंदाही अशीच काही परिस्थिती असणार असल्याचा अंदाज आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधील मास कॉपीप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती