Uddhav Thackeray Speech In Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) आज महाविकास आघाडीची एकत्रित सभा होत असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाषणाच्या सुरवातीलाच भाजपवर निशाणा साधला. सध्या अनेक ठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चा काढला जात आहे. पण हिंदूंचा नेता पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. 


दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहरात सभेला कधीही गर्दीचा दुष्काळ दिसला नाही. नेहमी गर्दीचा पूर पाहायला मिळतो. याच मैदानावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी आम्ही भाजपसोबत असताना शहराचे नाव बदललेलं नाही, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात नामांतराचा निर्णय झाला. 


सभेला तीनही पक्षाचे कार्यकर्ते...


छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाची एकत्रित सभा होत आहे. या सभेत ठाकरे गटासह राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सभेत उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान सभेला मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली असून, मैदानात जागा नसल्याने नागरिक बाहेर रस्त्यावर उभे राहून उद्धव ठाकरे यांचे भाषण आयकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सभेच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे. 


सभेला महिलांची मोठी गर्दी...


महाविकास आघाडीच्या सभेत महिलांची देखील मोठ्याप्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. तर महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर याचा नेत्यांच्या भाषणात उल्लेख करण्यात आला आहे. केवळ बस भाड्यात 50 टक्के सवलत देऊन महिलांचे प्रश्न मिटत नाही, महिलांच्या इतरही प्रश्नांकडं सरकारने लक्ष द्ययाल पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सभेला आलो असल्याची प्रतिक्रिया सभेला आलेल्या महिलांनी दिल आहे. 


ठिकठिकाणी वाहतूक कोंडी...


महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाची एकत्रित सभा छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानात होत आहे. दरम्यान सभेसाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील नागरिक सभेसाठी शहरात आल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होताना पाहायला मिळत आहे. तर सभापरिसरातील अनेक चौकात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. निराला बाजार आणि खडकेश्वर, फुले चौकसह अनेक चौकात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.