ED Raid News : ईडीच्या पथकाने (ED) शुक्रवारी (17 मार्च) छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar News) वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आहे. पंतप्रधान आवास योजनेतील निविदात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र याच छापेमारी दरम्यान एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली आहे. कारवाईसाठी गेलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबातील एक मुलगी दहावीची परीक्षेला गेली होती. त्यामुळे कारवाई सुरु असताना घरातील सदस्यांनी मुलीला परीक्षा केंद्रावरुन आणण्यास जाण्याची परवानगी ईडीच्या पथकाकडे मागितली. पण कुटुंबातील सदस्यांना एकटे न जाऊ देता 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या चुलत्याला सोबत घेत स्वतःच्या गाडीतूनच मुलीला परीक्षा केंद्रावरुन घरी आणले.
छत्रपती संभाजीनगरमधील काही कंत्राटदाराच्या घरावर शुक्रवारी ईडीने छापे टाकले. याचवेळी 'इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस'चे रितेश कांकरीया यांच्या उल्कानगरीतील आदित्यनगरातील पसायदान अपार्टमेंटमधील फ्लॅटवर देखील एका पथकाने धडक दिली. पथकाने छापेमारी केली तेव्हा घरात रितेश यांच्या भावासह पत्नी आणि मुलं उपस्थित होती. तर रितेश यांच्या दहावीतील मुलगी परीक्षेसाठी गेली होती. पण दुपारी एक वजता तिचा पेपर सुटणार असल्याने रितेश यांच्या भावाने पुतणीला आणण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. तेव्हा पथकातील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या गाडीत रितेश यांच्या भावाला बसवून परीक्षा केंद्रावर घेऊन गेले. तसेच पुन्हा स्वतःच्या गाडीत मुलीला परीक्षा केंद्रावरुन घरी आणले. दरम्यान रुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती.
आज सकाळपर्यंत सुरु होती कारवाई...
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदा घोटाळ्या प्रकरणी ईडीने शुक्रवारी सकाळी पहाटेच नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान शुक्रवारी दिवस आणि रात्रभर सुरु असलेली कारवाई आज सकाळी 6 वाजता संपली आहे. त्यामुळे ईडी पथकाने केलेली कारवाई तब्बल 24 तास सुरु असल्याचे पाहायला मिळाले.
काय आहे प्रकरण!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्याच्या चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आली होती. या प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यातील काही कंपन्यांनी अटींचे पालन न करता फसवणूक करण्याच्या प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यावर यातील समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सव्र्हिसेस व जगवार ग्लोबल सव्र्हिसेस या तीन कंपन्यांनी एकाच लॅपटॉपवरुन म्हणजे एकाच ‘आयपी’ अॅड्रेसवरुन भरल्याचे समोर आले. त्यामुळे सिटी चौक पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर याच प्रकरणात संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती आणि आता कंत्राटदारांच्या घरी छापेमारी करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर शहरात 'ईडी'कडून छापेमारी; नऊ ठिकाणी कारवाई सुरु