Unseasonal rain : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. गहू, हरभरा, लिंबू, संत्रा, आंबा या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. तसेच द्राक्ष बागांना देखील फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.


भंडाऱ्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस 


हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने भात, गहू, हरभरा यासह पालेभाज्यांची शेती धोक्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. दरम्यान, वीज पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केलं आहे.


वाशिम  


गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाने दमदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तर काही भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी, रामराववाडी, पिंपळशेंडा या भागात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने आणि गारपिटीने चांगलंच झोडपून काढलं आहे. यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, लिंबू, संत्रा, आंबा, कांदा यासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. 


नांदेड जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट


नांदेड जिल्ह्यातील अवकाळी पावसासह गारपीट झाली. जिल्ह्यातील मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील बसला आहे. अर्धापूर तालुक्यातील बागायत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तालुक्यात एकूण 543 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अर्धापूरला 7.4 मिलीमीटर पाऊस  झाला आहे. तर मुदखेड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुदखेड तालुक्यात 38.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात बागायत शेतीचे 1235 हेक्टर नुकसान झाले आहे. जिरायत शेतीचे 400 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण 3083 हेक्टरील पिकांचे नुकसान झाले आहे.


गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं आहे. या पावसामुळे काढणीसाठी आलेल्या खरबूज, टरबूज, गहू, रब्बी ज्वारी, मका, पपई बागांना मोठा फटका बसला आहे. त्याचसोबत चार दिवसांपासून सलग सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे गुरांसाठी चारा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच येत्या काळात चाऱ्याची तीव्र टंचाई भासण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.


गोंदियात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला नसल्याने पिकांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही. तांदूळ पिकाला हा पाऊस नवसंजीवनी ठरला आहे.


लातूर जिल्ह्यात अवकाळीचा शेतीपिकांना फटका


राज्यभरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. निलंगा, औरद शहाजानी, कासार बालकुंदा या भागात काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. पावसाने सकाळपर्यंत पाठ सोडली नव्हती. सकाळी पावसाचा जोर वाढला होता, त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या पिकांना फटका बसला आहे. ज्यांनी काढणी करुन ठेवली आहे, रास घरी नेली नाही त्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, परभणी जिल्ह्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू; शेतकरी चिंतेत