Chhatrapati Sambhaji Nagar:  छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेलं साखळी उपोषण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतलं आहे. जलील यांनी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर उपोषण मागे घेत असल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे. तर काही संघटनांकडून शहरात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने आपण उपोषण मागे घेतला असल्याचं जलील म्हणाले आहे. 


औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला आहे. दरम्यान याच निर्णयाला विरोध करत खासदार जलील यांनी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर 4 मार्च पासून साखळी उपोषण सुरू केलं होतं. तसेच हे उपोषण आणखी किती दिवस सुरू राहणार याबाबत सांगता येणार नसल्याचं जलील म्हणाले होते. मात्र आज पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर आपण उपोषण मागे घेत असल्याची माहिती जलील यांनी दिली. 


यामुळे घेतलं उपोषण मागे!


दरम्यान उपोषण मागे घेण्याचं कारण सांगताना जलील म्हणाले की, रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी हिंदू संघटनांचा मोर्चा आहे. त्यात काही चिथावणीखोर भाषणे करणारी व्यक्ती बाहेरुन येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. अशावेळी शहरातील वातावरण खराब होऊ नये ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही साखळी उपोषण स्थगित करत आहे. तसेच आमच्या निर्णयानंतर जर कोणी काही चिथावणीखोर भाषणे केल्यास त्यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ असेही जलील म्हणाले आहेत.


नामांतराविरोधात उपोषण 


औरंगाबाद जिल्ह्याचे (Aurangabad District) नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध केला. यासाठी जलील यांनी शनिवार, 4  मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण सुरु केले होते. औरंगाबादचे नाव हे औरंगाबादच ठेवायला पाहिजे अशी, त्यांची भावना आहे. आता आम्ही कोणत्याही प्रकारे राजकारण करत नाही. हे माझं शहर असून, त्यासोबत आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. तर आमच्या शहराचे नाव दिल्ली आणि मुंबईत बसून बदलू शकत नाही हे आम्हाला सरकारला सांगायचे आहे. देशात लोकशाही असून, तुमची हुकुमशाही चालणार नाही. त्यामुळे आम्हाला नामांतराचा निर्णय मान्य नाही, असे जलील यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवशी म्हटले होते. 


मात्र या उपोषणानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या उपोषणात औरंगजेबाचे पोस्टर झळकण्यात आले होते. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. जलील यांनी नामांतराविरोधात हरकती नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जवळपास 5 हजार हरकती नोंदवण्यात आल्या. याच्या प्रत्युत्तरा दाखल पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.