Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीही सुटता सुटत नाही. त्यातच सतत जलवाहिन्या फुटत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. दरम्यान बुधवारी (17 मे) पुन्हा एकदा शहरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असल्याने आज (18 मे) होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पैठण महामार्गाचे काम सुरु असताना ढोरकीन पंपहाऊसजवळ जेसीबी मशीनचा धक्का लागून मुख्य जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह फुटला. त्यामुळे संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बंद करण्यात आला. वॉल्व दुरुस्तीच्या कामाला उशीर लागल्याने गुरुवारी (18 मे) रोजी सिडको-हडकोसह शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.


जेसीबीचा धक्का लागून जलवाहिनीचा एअर वॉल्व फुटला


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम करताना छत्रपती संभाजीनगर शहराच्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला जेसीबी मशीनचा धक्का लागला आणि जलवाहिनीचा एअर वॉल्व फुटला. यामुळे पंधरा ते वीस फूट उंचीचे कारंजे जलवाहिनीतून उडू लागले. परिणामी लाखो लिटर पाणी वाया गेले. ही घटना पैठण रोडवरील ढोरकीन पंपहाऊसच्या पुढे घडली. एअर वॉल्व फुटल्याची माहिती मिळताच 1200 मिली मीटर व्यासाच्या जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.बी. काजी, किरण धांडे यांनी ढोरकीन पंपहाऊसच्या दिशेने धाव घेतली. 


जलवाहिनीद्वारे सिडको-हडकोमधील 70 ते 80 टक्के भागात पाणीपुरवठा


छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील एअर वॉल्व फुटल्याने पाणीपुरवठु बंद करण्यात आला. तर जलवाहिनी पूर्णपणे रिकामी झाल्यावर रात्री उशिरा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पहाटेपर्यंत सुरु होते. त्यामुळे पाणीपुरवठा वेळापत्रक एक दिवसाने पुढे जाईल. विशेष म्हणजे या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरुन सिडको-हडकोसह शहरातील 70 ते 80 टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. 


शहरातील जलवाहिनीही फुटली....


जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असतानाच, गारखेड्यातील गजानन महाराज मंदिरासमोरुन उल्कानगरी भागाला पाणी पुरवठा करणारी 300 मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरु असताना अचानक तिला भगदाड पडले. बुधवारी सकाळी ही जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहू लागले. तर उल्कानगरी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या घटनेची माहिती मनपाचे उपअभियंता महेश चौधरी, कनिष्ठ अभियंता सुशील कुलकर्णी यांना मिळताच त्यांनी तातडीने जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर मनपा कर्मचारी जेसीबीने विस्कळीत दुरुस्तीचे काम हाती घेतले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : आमदाराचा एक फोन अन् एसटी बस हजर; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर