Devendra Fadnavis : ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास आहे, ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे. मोर्चे काढता मग अहवाल का तयार करत नाही? अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्यानं आरक्षण रखडलं असा आरोप भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 


ओबीसी भाजपचा श्वास आहे. आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या करण्यात आली,  अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्यानं ओबीसी आरक्षण रखडलं, याचा रिपोर्ट तयार करण्यासाठी कुणीही तयार नसल्याचं फडणवीस म्हणाले.  तसेच ठाकरे सरकार फक्त झोपा काढतंय, टाईमपास करत आहे. जाणीवपूर्वक हे आरक्षण राज्य सरकारने रखडवल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. 


'महाराष्ट्र सरकारनं मे महिन्यात एप्रिल-फूल केलं - फडणवीस


महाराष्ट्र सरकारनं व्हॅटमध्ये जी कपात केली ती फसवी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले, ''महाराष्ट्र सरकारनं मे महिन्यात एप्रिल-फूल केलं" इंधनाच्या केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर अधिक आहे, इंधनाच्या करावरून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन छेडणार असा इशारा फडणवीसांनी दिला आहे, सांगा महागाई कोणामुळे वाढली? राज्य सरकार कांदा उत्पादकांसाठी काय करतंय? मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेंना फडणवीसांनी यावेळी प्रश्न केले आहेत. केंद्राने 10 रुपयाने टॅक्स कमी केल्यानंतर आपल्याकडे दीड रुपयाने टॅक्स कमी झाला. नाना पटोले, अजित पवार आणि मुख्यमंत्री यांनी उत्तर द्यावे की, तुम्ही रोज पेट्रोल डिझेलवर टाहो फोडता, तर मग आता पेट्रोल डिझेलचे वाढत्या किमतीला जबाबदार कोण? टॅक्स कमी करणारे की वाढवणारे? राज्यात महागाई आहे ती फक्त या सरकारमुळेच, पेट्रोल-डिझेलचे टॅक्स कमी करावे यासाठी आपण आता आंदोलन केले पाहिजे. असे फडणवीस यावेळी म्हणाले


पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात


8 वर्षात मोदींवर अनेक आरोप झाले, पण पंतप्रधान मोदींनी दोन वेळा कर कमी केले होते. मोदींनी भारताला शक्तीशाली केलं. मोदींच्यी काळात निर्यातीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात. बोलणारे खूप आहेत, पण तसं वागत नाहीत, असे फडणवीस म्हणाले.


भाववाढीवर ठोस उपाययोजना करणारा देश 'भारत'


फडणवीस म्हणाले, 12 आणि 13 साली आपण इम्पोर्ट करायचो पण एक्स्पोर्ट करत नव्हतो. तेव्हा या देशात एक इको सिस्टीम तयार झाली. भाववाढीवर ठोस उपाययोजना करणारा देश भारत आहे. अमेरिका आणि युरोपच्या नाकावर टिच्चून आपण ऑइल खरेदी केले. देशात मोदी सरकारने दोन वेळा पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. केंद्राच्या सेसमधून केंद्राने थेट 10 रुपये कमी केले. यामुळे 2 लाख 20 हजार कोटी नुकसान झाले आहे. 


राज्य सरकारने कांद्याच्या शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे - देवेंद्र फडणवीस


फडणवीस म्हणाले, आमच्या देशातला गहू सामान्य माणसासाठी राखून ठेवला पाहिजे, तो निर्णय मोदींनी घेतला. राज्य सरकारने कांद्याच्या शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे. व्हिजन असलेलं पंतप्रधान या देशाला लाभले. नो सेलिब्रेशन ओन्ली कम्युनिकेशन असे मोदींनी आपल्याला सांगितले आहे. जे आपल्याला मत देत नाहीत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. काही पक्षाची अशी अवस्था आहे की त्यांच्या फक्त चिंतन बैठक होतात. यांचे चिंतन नाही तर चिंता बैठक आहे. परिवार वादी पक्षाची अवस्था देशाला न्याय देऊ शकत नाही, याचवेळी आपले संपर्क अभियान आहे. भाजपला आशीर्वाद तर मिळणारच आहे