मुंबई :  भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा जवळचा सहकारी सुभाष शंकर परब याला इजिप्तमधील कैरोमधून अटक करून भारतात आणण्यात सीबीआयला यश आलं आहे. याच परबला मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला सीबीआयच्या मागणीनुसार 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.


तपासयंत्रणेच्या आरोपांनुसार परब हा पीएनबी बँकेच्या अधिका-यांसोबत लोनसंदर्भात सतत संपर्कात होता. तसेच तो नीरव मोदीच्या कंपनीची परदेशातील बँक खातीही हाताळत होता. नीरव मोदीशी संबंधित सर्व व्यवहारांचा त्याला खडानखडा माहिती होती. त्यामुळेच ज्यादिवशी नीरव मोदी देश सोडून पळाला त्याच दिवशी परबही देशातून बाहेर पडला. मात्र परबच्यावतीनं कोर्टाला सांगण्यात आलं की, तपासयंत्रणा विनाकारण त्याला आणि कुटुंबियांना त्रास देत आहे. आपण केवळ नीरव मोदीच्या कंपनीतील एक कर्मचारी होतो. आपण केवळ आपली नोकरी करत होतो.


पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 400 कोटींचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासह भारतातून पसार झाला आहे. पीएनबी बँक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या विनंतीवरून साल 2018 मध्ये इंटरपोलने नीरव मोदीसह त्याचा कर्मचारी सुभाष शंकर विरोधातही रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सीबीआयनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे इंटरपोलच्या मदतीनं चार वर्षांपूर्वी ही रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली होती. त्यानुसार नीरव मोदीचा जवळचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमधील कैरो शहरामधून अटक करण्यात आली होती.


नीरव मोदीनं पीएनबी बँकेत सुमारे 6,500 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तो सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. ईडी नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. नीरव मोदीनं 2017 मध्ये त्याच्या कंपनी फायरस्टार डायमंड्सद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस इमारत खरेदी केली होती. त्याचे हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना होती. पीएनबी घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळत आहे.