Maharashtra News: मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का लावणार, असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिला आहे.  एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 


आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार गोव्याला नाही


शंभूराज देसाई म्हणाले की, मी यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल, असं देसाई म्हणाले. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी, असंही देसाई यावेळी म्हणाले. 


तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचना


शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत.  महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यामध्ये खूप स्वस्तात दारु मिळते. दरामध्ये असलेल्या फरकामुळं मोठ्या प्रमाणात गोव्यातून इतर राज्यात तस्करी होत असते. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात गोव्यातून दारु येते. 


दारु तस्करीचं प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल


यांसदर्भात बोलताना कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितलं की, गोव्याहून येणाऱ्या ज्या रस्त्यांवर तपासणी होत नाही तिथे आम्ही सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जाऊ शकतात असे केबिन तयार करणार आहोत. सध्या वारंवार गुन्हा करणाऱ्यांविरोधात मकोकाच्या कलम 93 अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे तस्करीचं प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल, असं देखील आवळे यांनी सांगितलं.


इतर महत्वाच्या बातम्या


Bomb Threat Onboard : इराणहून चीनकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, धमकीनंतर भारतीय वायू दलाकडून विमानाला सुरक्षा


ABP CVoter Survey : गुजरातमध्ये कुणाला मिळणार सत्ता? आपनं काँग्रेसला दिला धक्का, जाणून घ्या जनतेचा कौल