Maharashtra Electricity Price hike : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक (Electricity Price hike) बसला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL), बेस्ट, अदानी आणि टाटा पावरच्या वीज दरात वाढ झाली आहे. आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी महावितरण कंपनीने आर्थिक भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे. घरघुती वीजेच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. 


कोणत्या कंपनीनं किती केली दरवाढ?


MSEDCL च्या ग्राहकांना 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ झाली आहे. तर बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के तर 2024-25 साठी 6.35 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के तर 2023-24 साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. 


 वीजेच्या मागणीत मोठी वाढ


सध्या राज्यात उन्हाळा चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा वाढल्यानं वीजेच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. त्यास्थितीत महावितरणच्या कराराअंतर्गत विजेने कमाल मर्यादा गाठली आहे. परिणामी राज्य सरकारी कंपनीला किमान दोन हजार मेगावॉट वीज बाहेरून खरेदी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळं विजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महावितरण कंपन्यांचे ग्राहकांसाठीचे वीजदर पंचवार्षिक असतात. त्यानंतर या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. सध्याचे दर एक एप्रिल 2020पासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांचा आता मध्यकालीन आढावा घेतला जात  असून विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यास या वर्षी एक एप्रिलपासून नवीन दर लागू होऊ शकतात.


अदानी  इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल म्हणाले,अदानी इलेक्ट्रिसिटीच्या नुतनीकरण क्षमतेतील हिस्सा वाढविण्यासाठीच्या अथक प्रयत्नांमुळे आणि वीजखरेदी खर्च अनुकुलतेमुळे आम्ही केलेली दरवाढ ही संपूर्ण महाराष्ट्रात तुलनेत कमी आहे, याची खात्री यानिमित्ताने झाली आहे. आजच्या अस्थिर इंधनाच्या किमतींच्या स्थितीत देखील यामुळे देशभरात प्रस्तावित दरवाढ होऊ शकते. आमच्या ग्राहकांना बहुसंख्य दर श्रेणींमध्ये सर्वात स्पर्धात्मक दरांसह सेवा देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. आम्ही भारतासाठी उज्वल आणि अधिक शाश्वत ऊर्जा  निर्मिती करण्यासाठी तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जेमध्ये यापुढेही गुंतवणूक करण्यास सक्षम आहोत.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Electricity Price Hike: महावितरण ग्राहकांना देणार दरवाढीचा शॉक! MERC कडे 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव