Agriculture News : यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं राज्यभरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात (Rabi crops) रेकॉर्ड ब्रेक हरभऱ्याची लागवड (Gram Cultivation) केली आहे. हरभऱ्याचं उत्पादनही यावर्षी चांगल झालं आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होऊ नये, म्हणून शासनाने नाफेड (Nafed) अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू केली आहे. मात्र, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं समोर आलं आहे. नाफेडचं खासगी व्यापाऱ्यांशी साटंलोटं असून, यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.


बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हरभरा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी न करता शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर व्यापाऱ्यांचा हरभरा खरेदी केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. विशेषतः आदिवासी भागातील हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हरभरा हा निकृष्ट दर्जाचा दाखवून तो खरेदी केला जात नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचा हरभरा हा खराब दर्जाचा असला तरी खरेदी केला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.


नेमकं प्रकरण काय?


राज्यात नाफेडच्या माध्यमातून हमीभावानं हरभऱ्याची खरेदी सुरु करण्यात आली आहेत. हरभऱ्याला 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची खरेदी करताना, त्यांचा हरभरा कमी दर्जाचा असल्याचे सांगून कमी दरानं खरेदी केली जात आहे. दर कमी केल्यामुळं शेतकरी नाफेडच्या केंद्रावर हरभऱ्याची विक्री न करता खासगी व्यापाऱ्याला हरभरा विकत आहेत. त्यानंतर खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हरभरा त्यांच्याच सातबाऱ्यावर नाफेडच्या खरेदी केंद्रावर विकत असल्याचे समोर आलं आहे. हा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव या तीन तालुक्यात पाहायला मिळत आहे. या प्रकारात नाफेडचे अधिकारी आणि व्यापारी यांच्यात साटंलोटं असल्याचे बोलले जात आहे.


राज्यात 29 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड


यावर्षी राज्यात 29 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्रावर रेकॉर्ड ब्रेक हरभऱ्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 10 लाख मेट्रिक टन अधिकच हरभरा उत्पादन होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून सरकारनं नाफेड अंतर्गत 552 खरेदी केंद्रांनं मंजुरी दिली. यापैकी राज्यात 510 खरेदी केंद्र सुरु झाली आहेत. सरकारनं शेतकऱ्यांकडून 88 लाख मेट्रिक टन हरभरा खरेदीच उद्दिष्ट ठेवलं आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात सध्या 24 हरभरा खरेदी केंद्र सुरु कण्यात आली आहेत. मागील वर्षी 75 हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. मात्र, यावर्षी कमी खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : नाफेडकडून हरभरा खरेदी नोंदणीस मुदतवाढ, 31 मार्चपर्यंत करता येणार नोंदणी