Beed News : बीड जिल्ह्यातील (Beed District) अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. "पप्पा, तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारत आहेत. खूप त्रास होतोय,' अशी व्यथा वडिलांच्या गळ्यात पडून सांगितली. वडिलांनी सासरच्या मंडळींना समजावून सांगत ते गावी लातूरला परतले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मेघा निखिल करवे (वय 22 वर्षे, रा. साळुंकवाडी, ता. अंबाजोगाई) असे मृत विवाहितेचे नाव आहे.


मयत मेघाचे वडील भरत यशवंत खज्जे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी आपली मुलगी मेघा हिचा विवाह 21 मे 2012 रोजी साळुंकवाडी येथील निखिल करवे याच्यासोबत लावून दिला होता. सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु असताना, काही दिवसांनी मेघाचा छळ सुरु झाला. "तुला स्वयंपाक येत नाही, घरातील काम येत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नात आमचा मानपान केला नाही," असे म्हणत त्रास देऊन मारहाण करण्यात येऊ लागली. तसेच पिकअप व सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी तीन लाख रुपये माहेरहून घेऊन ये, असे म्हणत तिला मारहाण होऊ लागली. 


व्यथा वडिलांच्या गळ्यात पडून सांगितली


नेहमीच्या त्रासाला कंटाळून मेघाने हा प्रकार वडिलांना सांगितला. मुलीचा फोन आल्यावर भरत खज्जे 13 मे रोजी गावातील काही लोकांना घेऊन मेघाच्या घरी आले. जावई आणि सासरच्या लोकांना समजावून सांगितले. यावेळी मेघाने वडिलांच्या गळ्यात पडून आपल्याला होत असल्याला त्रासाची व्यथा मांडली. "पप्पा, तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारत आहेत. खूप त्रास होतोय," अशी व्यथा वडिलांच्या गळ्यात पडून सांगितली. 


परंतु, तरीही सासरच्या लोकांनी तिचा छळ थांबवला नाही. यालाच कंटाळून मेघाने वडील परतताच घरी कोणीही नसल्याची संधी साधून गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मेघाचे वडील भरत यशवंत खज्जे यांच्या फिर्यादीनुसार पती निखिल करवे, सासू वर्षा करवे, सासरे गंगाधर करवे आणि दीर आदित्य करवे यांच्याविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News: पालकांनो, अल्पवयीन मुलींकडे लक्ष द्या! बीड जिल्ह्यात पाच दिवसाला एक मुलगी गायब