Beed News : राज्यात तरुणी बेपत्ता (Missing) होण्याचे प्रमाण वाढले असल्याची आकडेवारी समोर आली असतानाच, बीड जिल्ह्यात (Beed District) देखील पाच दिवसाला एक मुलगी गायब होत असल्याचे समोर आले आहे. तर अल्पवयीन मुलीच नव्हे तर विवाहित महिला, लेकरांची आई देखील बेपत्ता होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. बीड जिल्ह्यात मागील दोन महिन्यात 18 वर्षावरील 30 पेक्षा अधिक महिला, मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांकडून घेतल जात आहे. 'लोकमत'ने याबाबत वृत्त दिले आहे. 


मागील वर्षभरापासून प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यात पाच दिवसाला एक अल्पवयीन मुलगी गायब होत आहे. त्यामुळे 'सोळावं वरीस धोक्याचं,' हे यानिमित्ताने आता खरे ठरू लागले आहे. तर गायब झालेल्या मुलींमध्ये 14 ते 18 वर्षातील मुली गायब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. अगदी दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगीही प्रेमात पडून प्रियकरासोबत धूम ठोकत आहे. त्यामुळे पालकांची देखील चिंता वाढली आहे. तर 18 वर्षांच्या आतील मुलगा अथवा मुलीला पळवून नेले किंवा बेपत्ता झाली तर कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. परंतु वास्तविकता हे खरोखरच अपहरण असते का? याबाबत प्रश्न असतो. 


पालकांनी देखील काळजी घेण्याची गरज...


विशेष म्हणजे मुली बेपत्ता होणाऱ्या घटनेला पालकही तेवढेच जबाबदार आहेत. कारण पालकांकडून आपल्या पाल्यांना विश्वासात घेतले जात नाही. कामाच्या ओघात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचाच गैरफायदा प्रियकर मुले घेताना पाहायला मिळत आहे. मुलींना वेगवेगळे आमिष दाखवत दोघेही सैराट होतात. त्यामुळे पालकांनी कामातून वेळ काढत आपल्या मुलीकडे देखील वेळ दिले पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यांना कुटुंबाचे प्रेम दिले पाहिजे. 


राज्यात रोज सरासरी 70 मुली बेपत्ता.. 


तरुणी बेपत्ता होण्याबाबत राज्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.  राज्यात गेल्या तीन महिन्यात 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. नवीन वर्षाच्या एकट्या मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद झाली आहे. म्हणजेच राज्यात रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे बेपत्ता तरुणींमध्ये सर्वाधिक 18 ते 20 या वयोगटातील मुलींचा समावेश असल्याचे देखील समोर आलंय. तर जानेवारी महिन्यात 1600 आणि फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता झाल्या असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra News: धक्कादायक! राज्यात रोज सरासरी 70 तरुणी होतायत बेपत्ता, मार्च महिन्यात 2200 मुली गायब