रायगड : रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांमध्ये सातत्याने वाढ होत असून हा धोका टाळण्यासाठी आणि जमिनीची धूप रोखण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यासाठी, जिल्ह्यातील गावांना ग्रामपंचायत हद्दीत 'बांबूची बेटे' उभारण्यात येणार आहेत. गेल्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यात चक्रीवादळ, पूर आणि अतिवृष्टी याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यातच, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड येथील तळीये पोलादपूर येथील साखर सुतारवाडी या गावांना दरडीचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये, सुमारे 87 रहिवाशांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे तर अनेक रहिवाशांचे डोक्यावरचे छप्पर तुटून गेले आहे.
दरम्यान, पावसाळ्यात कमी वेळेत 500 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते. तर, दरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील बाजूस डोंगर कापण्याचे काम केल्यास, तसेच डोंगर उतारावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्यास कमकुवत भूपृष्ठावर झाडांचे कमी झालेले प्रमाणामुळे दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यातच, रायगड जिल्ह्यात वाढते नागरीकरण, वृक्षतोड, उत्खनन अशा कारणांमुळे दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांमध्ये सातत्याने वाढ होत असून हा धोका टाळण्यासाठी आणि जमिनीची धूप रोखणे गरजेचे आहे.
'बांबू' हे माती घट्ट पकडून ठेवत असून यातून पाण्याचे देखील संवर्धन होणार आहे. त्यामुळे, जिल्ह्यात बांबू लागवड करण्यासाठी नियोजन केले आहे. यासाठी, तालुकास्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असून महाड परिसरात सुमारे 45 हजार बांबूंची लागवड करण्यात आली असून आणखी शेतकरी यात जोडले जात आहेत.
रायगड जिल्ह्यात सुमारे 169 गावे ही दरडग्रस्त असून 45 गावे पूरग्रस्त म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर, जिल्ह्यातील अनेक गावातील डोंगर भागांमध्ये वाढत्या वृक्षतोडीमुळे मुसळधार पावसात माती ठिसूळ होऊन पुराचे प्रमाण वाढत आहे. त्यातच, मातीची धूप होत असल्याने दरड कोसळण्या बरोबरच पुराची परिस्थिती ही भयावह होऊ लागली आहे.
यामुळे, पूर आणि दरड या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात 'बांबूची बेटे' लावण्यात येणार आहेत. यासाठी, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना बांबूची लागवड करण्याच्या सूचना करण्यात आले असून बांबूची लागवड केल्यास मातीची होणारी धूप रोखता येणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha