अहमदनगर : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे (Dr Sujay Vikhe Patil) मागील काही दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यावरून चर्चेत येत आहेत. त्यांच्या आणखी एका वक्तव्याने अहमदनगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.'राहतात, पक्ष जातात. ज्या पक्षासाठी मोदींच्या विरोधात मी पाथर्डीत रॅली केल्या, त्यांच्याविरोधात भाषण केले तो पक्ष आम्हाला न्याय देऊ शकला का? नाही देऊ शकला म्हणून आम्ही पलटी मारली. जिथे न्याय मिळेल तिथे आम्ही आहोत. आमच्यावर अन्याय करा, आम्ही एक मिनिटात पलटी मारू असं वक्तव्य खासदार विखे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चा सुरू झाल्यात.ते श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना विखे म्हणाले की, एक माणूस एका कुटुंबाविरोधात, एका वैचारिकतेविरोधात आजीवन लढला म्हणून त्याच्यावर अन्याय व्हावा, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढला म्हणून त्यांच्यावर अन्याय व्हावा. हा अन्याय आम्हाला मान्य नाही.असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. मात्र, 'आमच्यावर अन्याय केला तर एका मिनिटात आम्ही पलटी मारू' या त्यांच्या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
विखे म्हणाले की, आम्ही कार्यकर्ते जिवंत ठेवतो. आमचा गट जिवंत ठेवतो. ज्या दिवशी विखेंचे कार्यकर्ते संपतील त्या दिवशी शेतकऱ्यांना कोणीही वाली राहणार नाही असं विखे म्हणाले. आमचे कुणाशी वैर नाही. आम्ही कुणाला पाडले नाही आणि कुणाला निवडूनही दिले नाही, असं खासदार विखे यांनी स्पष्ट केले.
बेलवंडी बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन खासदार विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटा, घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha