Vitthal Rukmini Temple Pandharpur: पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची धक्कादायक रितीने झालेल्या झीज प्रकरणाचे वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते. त्यांनतर आता पंढरपुराच्या मंदिरातील रुक्मिणीच्या मूर्तीवर येत्या 15 दिवसात वज्रलेपन केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचं पथक पंढरपुरात जाणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर यासाठी शनिवारनंतर पुरातत्व विभागाचं एक पथक पंढरपुरात जाणार आहे. विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या आधी रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेपन केले जाणार आहे.
कोरोनाकाळात लॉकडाऊन सुरु असताना 23 आणि 24 जून 2020 रोजी पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला होता. पुरातत्व विभागाने विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीच्या पायावर सिलिकॉनचे लेप दिले होते. हा लेप पुढील 7 ते 8 वर्षे तसाच राहिल असा दावा करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या पायावरील दर्शन 2 एप्रिलपासून सुरु करण्यात आले. यावेळी मूर्तीच्या पायाची मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याच्या तक्रारी भाविकांतून करण्यात आल्या. या प्रकरणाचे वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते.
झीज प्रकरणाचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याची गांभीर्याने दाखल घेत तातडीने बैठक बोलावली होती. या संदर्भात पुरातत्व विभागाशी तातडीने संपर्क साधून दुरुस्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पंढरपुराच्या मंदिरातील रुक्मिणीच्या मूर्तीवर येत्या 15 दिवसात वज्रलेपन केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी रासायनिक पद्धतीने प्रकिया करून रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेपन केले जाणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भाविकांनी केली होती नाराजी व्यक्त...
मूर्तीच्या पायाची झालेल्या झीजबद्दल वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते. त्यानंतर अनेक महिला वारकरी, भाविकांनी रुक्मिणीच्या पायाला झालेल्या जखमा तातडीने दुरुस्त करा अशा भाषेत नाराजी व्यक्त केली होती. तर काही भाविकांनी ही झीज थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यांनतर मंदिर प्रशासनाने यांची दखल घेत बैठक बोलावली होती.