Aurangabad News: औरंगाबाद दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली. तर शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.तर धीर सोडू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू यात असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या गावातील नुकसानग्रस्त भागातील उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोबतच आम्ही सर्व तुमच्या सोबत असल्याचे सुद्धा सांगितले. तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, नोटिसा थांबवा, अशी कैफियत शेतकऱ्यानी उद्धव ठाकरेंसमोर मांडली.
सत्तांतरनंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच दौरा...
राज्यात शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे हा दौरा ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केला असल्याने, सत्ताधारी यांना घेरण्याचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे. उद्धव ठाकरे आजारी असतांना देखील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटात यानिमित्ताने चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठ्वेण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक पोलिसांचा यावेळी मोठा फौजफाटा पाहायला मिळाला.