Aurangabad Crime News: यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, बाजारात आवक कमी झाल्याने कापसाला (cotton) चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या याच पांढऱ्या सोन्यावर आता चोरट्यांचे लक्ष असून, सोयगाव तालुक्यात एका शेतकऱ्याचा 17 क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसात (Soygaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव शिवारातील शेतकरी दत्तात्रय महादू आस्वार यांनी शेतीमाल उत्पन्नाचा माल ठेवण्यासाठी शेतात पत्र्याचे शेड तयार केलेले आहे. दरम्यान याच शेडमध्ये त्यांनी शेतातील वेचणी करून ठेवलेला 25 क्विंटल कापूस साठवून ठेवला होता. दरम्यान चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री शेडचे कुलूप, कोयंडा तोडून आत प्रवेश करून शेडमधील वेचणी करून ठेवलेल्या कापसापैकी एक लाखाचा 17 क्विंटल कापूस वाहनात भरून चोरून नेला. दत्तात्रय आस्वार हे सकाळी शेतात गेल्यावर त्यांना शेडचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता कापूस चोरीला गेल्याचे त्यांचे लक्षात आले.
पोलिसात गुन्हा दाखल...
शेतातील शेडमध्ये ठेवलेला कापूस चोरीला गेल्याचे लक्षात येताच शेतकरी दत्तात्रय आस्वार यांनी याची माहिती तत्काळ सोयगाव पोलिसांना दिली. तर माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आस्वार यांच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात पाच ते सहा अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या जुगाड...
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोयगाव तालुक्यात शेतातील उभ्या कापसाच्या पिकाला फुटलेला कापूस चोरीच्या घटना देखील वाढलाय आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शक्कल लढवत शेतात विद्युत रोषणाई केली आहे. तसेच पाच-सहा शेतकरी रात्रीच्या सुमारास एकाठिकाणी थांबून शेतात रात्रीचा मुक्काम करतायत. तसेच शेतात लावलेल्या रोषणाई मुळे शेतात येणारे चोरटे लगेच दिसून येतात. त्यामुळे कापसाची चोरी रोखण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. पण आता चोरट्यांनी शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कापसाला लक्ष केल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ...
आधीच अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यात उरल्यासुरल्या पीकाला वाचवून शेतकरी त्यातून उत्पन्न काढत असतानाच, कापूस चोरीच्या घटना सर्वत्र वाढल्या आहेत. तर शेतातून उभ्या पिकातून कापसाची चोरी होत असतानाच, आता वेचणी करून ठेवेलेल्या कापसावर सुद्धा चोरटे डल्ला मारतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होतांना पाहायला मिळत आहे.