Aurangabad News: बदलत्या तापमानामुळे अनेकदा पीकांवर वेगवेगळे रोग येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. मात्र तुमच्या पीकावर कोणता रोग येणार आहे हे तुम्हाला आधीच कळाले तर कसं होईल. तुमचा विश्वास बसणार नाही, पण औरंगाबादच्या दोन सख्ख्या भावांनी पीकांचे भविष्य सांगणारे खेती ज्योतिष नावाचा डिव्हाईस तयार केला आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देण्यासाठी आतापर्यंत अनेक उपक्रम बाजारात आली, मात्र औरंगाबादच्या समीर पितळे आणि प्रतीक पितळे या सख्ख्या बंधूंनी काही वेगळाच प्रयोग केला आहे. कारण त्यांनी तयार केलेल्या ‘खेती ज्योतिष’ डिव्हाईस चक्क शेतातील पिकांचे भविष्य सांगतो. शेताच्या मध्यभागी लावलेल्या या डिव्हाईसवर सुमारे 5 एकर जमिनीचा विविध 16 मुद्यांच्या आधारे डेटा जमा केला जातो. या डेटाच्या आधारावर पिकांवर कोणते रोग येऊ शकतो याचा अंदाज लावता येतो.
असा चालतो 'खेती ज्योतिष'
पितळे बंधूंनी तयार केलेला 'खेती ज्योतिष' डिव्हाइस सौरऊर्जेवर चालतो. या डिव्हाइसमध्ये सीमकार्ड असून ते इंटरनेटशी जोडले आहे. ज्यामुळे शेताचे तापमान, मातीचा ओलावा, वाऱ्याची दिशा व वेग, सूर्यप्रकाश, पाऊस किती झाला, धुके, दवबिंदू आदी माहिती एका ठिकाणी जमा होते. याच माहितीच्या आधारावर शेतकरी आपल्या पीकांवरील रोगराईचा अंदाज लावू शकतो. शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्यास शेतकरी देखील रोगाचा प्रभाव कमी करण्यास तसेच कीटकनाशके वापरण्यासंबंधी काळजी घेऊ शकतो.
असा होणार फायदा...
- खेती ज्योतिष नावाचा डिव्हाईस पीकांचे भविष्य सांगणारं.
- पीकांवर कोणता रोग येणार याची आधीच माहिती मिळणार.
- पीकांचा डेटा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार.
- प्रत्येक दोन मिनिटाला ‘क्लाऊड’वर माहिती पाठविली जाऊ शकते.
- वेगळ्या विजेच्या कनेक्शनची गरज नाही.
- शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्यास याचा शेतकऱ्यांना फायदा होणार.
- आधीच माहिती मिळाल्यास योग्य वेळी फवारणी करून शेतकरी नुकसान टाळू शकणार .
अशी सुचली कल्पना...
पितळे बंधू गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या संशोधनावर सतत काम करत असतात. दरम्यान 2018 मध्ये ‘स्टार्टअप इंडिया चॅलेंज’मध्ये ‘पोस्ट हार्वेस्ट लॉसेस’ कमी कसे करावे यासाठी स्पर्धा झाली होती. यासाठी संशोधन केल्यावर पितळे बंधू यांना शेतकऱ्यांच्या समस्या समजल्या. त्यामुळे पीकांवर कोणते रोग येणार हे आधीच शेतकऱ्यांना कळाले तर त्यांना मोठं नुकसान टाळता येईल असे त्यांना सुचले. यातून त्यांनी ‘खेती ज्योतिष’ स्टार्टअप सुरू केले. यावर गेली तीन वर्षे काम करीत आता याची मोबाईल ॲप तयार करण्याचे काम सुरू आहे.