Agriculture News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतीत सतत अपयशाचा सामना करतोय. मात्र अशातही जिद्द आणि मेहेनतीच्या जीवावर धनगाव येथील एका पदवीधर शेतकऱ्याने चक्क दिड एकर सीताफळ बागेचे योग्य पध्दतीने नियोजन करून 12 लाखांचे उत्पन्न गृहित धरले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या बागेतील आतापर्यंत जवळपास 11 टन सीताफळे विकली गेली आहे. 


धनगाव येथील संजय कनसे हे अल्पभुधारक शेतकरी आहे. यापूर्वी पारंपारिक पिकांची शेतीर करणाऱ्या कनसे यांनी काही तरी वेगळ करण्याचा विचार केला आणि 2016 साली त्यांनी आपल्या दिड एकार शेतात सीताफळ बाग लावली. सोबतच इतर क्षेत्रात मोसंबीची लागवड केलेली आहे. ज्यात कनसे यांनी सोळा बाय सोळा फुटांवर 600 झाडांची लागवड केली. दरम्यान अनेकदा ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळा सारखी संकट देखील आले. पण त्यातून त्यांनी मार्ग काढत बाग जिवंत ठेवली. आता त्यांच्या याच कष्टाला फळ लागत आहे. आज एका झाडाला 35 ते 40 किलोप्रमाणे फळ मिळत आहेत.


आतापर्यंत जवळपास 11 टन सीताफळे विकली


कनसे यांना तीन वर्षापासून उत्पादन सुरू आहे. यंदा सीताफळाच्या दिड एकार शेतीतून जवळपास 20  टन उत्पन्न होणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी संजय कनसे यांच्या सीताफळाच्या फळाचा पहिला आणि दुसरा तोडा झाला आहे. यामध्ये त्यांना 110 रूपये किलो भाव मिळाला आहे. आतापर्यंत जवळपास 11 टन सीताफळे विकली गेली असून, अजून 9 ते 10 टन फळे निघणार आहेत. 


यावर्षी बागेसाठी त्यांनी 80 ते 90 हजार रूपये खर्च


कनसे यांच्या शेतातील सीताफळ तोडल्यानंतर चौथ्या दिवशी खाण्यायोग्य तयार होत आहेत. एक फळ 500 ते 700 ग्रॅम भरत आहे. यावर्षी बागेसाठी त्यांनी 80 ते 90 हजार रूपये खर्च केला आहे. या सीताफळाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकावर मिलीबग या रसशोषक किडीवगळता अन्य कोणताही प्रादुर्भाव होत नाही. मात्र यावर्षी फूल धारण करतांना सुरुवातीला पाऊस जास्त झाला. त्यामुळे फळ धारणावेळी मोठ्या अडचण आल्या. परंतु कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या सल्ल्याने कनसे हे सीताफळ शेतीत यशस्वी ठरले आहेत.


यशोगाथा! डाळींबाच्या शेतीतून वीस लाखांचे उत्पन्न; खडकाळ जमिनीवर बाग फुलवली