Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी दोन साखर कारखान्यांकडून ऊसाची पहिली उचल (sugarcane FRP in kolhapur) जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील शरद कारखान्याकडून 2900 तसेच शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर्सकडून 2903 पहिली उचल जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांचा हंगाम सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही कारखान्यांना पहिल उचल जाहीर न केल्याने विरोधाला सामोरे जावे लागले होते. 


शरद साखर कारखान्याकडून पहिली उचल जाहीर करण्यात न आल्याने जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली होती. त्यानंतर संघटना आणि कारखान्याकडून चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. अखेर चर्चेच्या तिसऱ्या फेरीत 2900 रुपये ऊचल जाहीर करण्यात आली. उर्वरित रक्कम नंतर जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे तोडगा निघाल्यानंतर दोन्ही संघटनांकडून आंदोलन स्थगित करण्यात आले. तथापि, एफआरपीचा लेखी आदेश आज मिळाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे. 


गुरुदत्त शुगर्सकडून 2903 पहिली उचल जाहीर 


दरम्यान, गुरुदत्त शुगर्सकडून 2022-23 गळीत हंगामासाठी पहिली उचल 2903 रुपये जाहीर केली आहे. अंतिम साखर उतारा व वाहतूक खर्च वजा जाऊन निव्वळ एफआरपी व आता दिलेला दर यातील फरकाची रक्कम हंगाम समाप्तीनंतर देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी सांगितले. कारखाना कार्यक्षेत्रातील  सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गुरुदत्त शुगर्सला गाळपास पाठवून सहकार्य  करण्याचे आवाहन त्यांनी केले. 


कोल्हापूर जिल्ह्यात 17 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु  


दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 17 कारखान्यांमध्ये गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने धुराडी पेटण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या हंगामासाठी 10.25 रिकव्हरीला प्रति टन 3 हजार 50 रुपये दर निश्चित केला गेला आहे. यापेक्षा जास्त दर द्यायचा असेल तर संबंधित कारखान्याने तो जाहीर करून हंगाम सुरू करण्यास सूचना साखर आयुक्तांनी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी पहिल्या उचलीची घोषणा केली आहे. हंगाम संपल्यानंतर शेवटी मिळणार्‍या उताऱ्याच्या आधारावर उर्वरित रक्कम द्यायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 सहकारी कारखाने व खासगी पाच कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या कारखान्याकडून किती दर 



  • बिद्रीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील उच्चांकी 3209 प्रतिटन

  • डी. वाय. पाटील साखर कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • संताजी घोरपडे कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • मंडलिक कारखाना हमिदवाडा 3 हजार रुपये प्रतिटन

  • शाहू कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • अन्नपूर्णा कारखाना केनवडे 2921रुपये प्रतिटन 

  • दालमिया भारत शुगर 3016 रुपये 


इतर महत्वाच्या बातम्या