Aurangabad News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर (Water Tank) चढून एका शेतकऱ्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी 'शोले स्टाईल आंदोलन' केले. अनेकदा संबधित बँकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने हा शेतकरी थेट पाण्याच्या टाकीवर चढला. तर आपली मागणी मान्य होईपर्यंत खाली उतरणार नसल्याचा या शेतकऱ्याने पवित्रा घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. तीर्थराज दत्तात्रय गिरगे (रा. नायगाव ता.पैठण, जी.औरंगाबाद) असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तीर्थराज गिरगे यांनी 2016 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पैठण शाखेतून 97 हजार शेतीसाठी कर्ज घेतले होते. दरम्यान सरकराने छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना अशा दोन कर्जमाफी योजना जाहीर केल्या. तर या दोन्ही कर्जमाफी योजनेस पात्र असतांना संबधित बँकेकडून कर्ज माफीच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ठ केले नसल्याचा आरोप गिरगे यांनी केला आहे.
तर बँकेने सदरील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी गिरगे यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली असून, थकीत रक्कम न भरल्यास न्यायालयात केस दाखल करण्याची धमकी दिली आहे. तर दोन्ही योजनेचा कर्ज माफीचा लाभ मिळावा म्हणून, विहित अर्ज देऊन देखील याचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच बँकेकडे वारंवार याबाबत चकरा देखील मारल्या होत्या, परंतु बँकेने उडवा उडवीचे उत्तरे देवून मला कर्ज माफी पासून वंचित ठेवले असल्याचा आरोप तीर्थराज गिरगे यांनी केला आहे.
पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन
अनकेदा मागणी करून आणि अर्ज करून देखील कर्जमाफी होत नसल्याने हतबल झालेल्या, तीर्थराज गिरगे यांनी आज चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पैठण तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर आज सकाळी गिरगे चढले आणि आपली मागणी पूर्ण होईपर्यंत खाली येणार नसल्याची भूमिका घेतली. सकाळी तहसील कार्यालयात अनेक लोकं कामासाठी येतात, त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्काळ संबधित बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून गिरगे यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवले.
अखेर बँकेकडून कर्ज खाते बंद...
कर्ज माफीचा लाभ मिळत नसल्याने तीर्थराज गिरगे यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्यामुळे अखेर बँकेच्या अधिकाऱ्यांनी गिरगे यांना कर्ज खाते बंद करण्याचे पत्र दिले आहे. गिरगे यांना देण्यात आलेल्या पत्रात बँकेने म्हंटले आहे की, 'गिरगे यांनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार त्यांच्या वसुलीची कार्यवाही स्थगित करून. कर्ज खाते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घ्यावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार गिरगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.