Aurangabad News: 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं विधान राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या याच विधानावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. कारण राज्यपाल यांच्या विधानावरून राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह संभाजीराजे यांच्याकडून निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे. 


छत्रपती संभाजीराजे: राज्यपाल यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देतांना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, राज्यपाल असे का बडबडतात हे मला अजूनही समजले नाही. मी यापूर्वीच म्हणालो आहे की, त्यांना महराष्ट्राबाहेर पाठवावे. तर पंतप्रधान यांना विनंती आहे की, अशी व्यक्ती नको आहे आम्हाला असेही संभाजीराजे म्हणाले. 


सुषमा अंधारे(ठाकरे गट) : राज्यपाल यांच्या या विधानावर बोलतांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्यात की, वादग्रस्त विधान करून कोश्यारी यांना चर्चेत राहणे आवडत असते.  त्यामुळे केंद्र सरकारने आमच्यासाठी राज्यपाल नेमून दिले आहेत की, महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी ठरवून तुमचा एखांदा माणूस पाठवला आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 


गजानन काळे (मनसे) : तर यावर बोलतांना मनसे नेते गजानन काळे म्हणाले की, राज्यपालांनी सुधारायच नाही अस ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता ? गडकरीजी, पवार साहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा, पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी टीकाही काळे यांनी केली आहे. 




संतोष शिंदे (संभाजी ब्रिगेड) : तर यावर प्रतिक्रिया देतांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले की, शिवद्रोही राज्यपाल भगतसिंग कोशारी साहेब यांचा निषेध...? कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही माणूस असून महाराष्ट्रातला नवीन वाचाळवीर म्हणून लवकरच नोंद होईल.


रोहित पवार (राष्ट्रवादी): राज्यपाल यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण  छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते.