Aurangabad News: राज्यातील उद्योग इतर राज्यात जात असल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच, औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या एथर एनर्जी या कंपनीसह चार कंपन्या औरंगाबादच्या डीएमआयसीत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असून, येत्या काही दिवसांत सुमारे 3500 कोटींची गंतवणुकीची घोषणा शासनस्तरावर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद परिसरात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या तसेच उद्योग विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसोबत चर्चा केली.


एथर एनर्जी ही इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी भारताती अग्रेसर कंपनीने ऑरिकमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून या मोठ्या गुंतवणूकीच्या अनुषंगाने  त्यांना अनुदान आणि प्रोत्साहनसाठी शासनाचे  सहकार्य करावे, तसेच एड्रेस+हौझर आपला चीन मधील प्रकल्प भारतात आणू इच्छित आहे, ही मोठी गुंतवणूक औरंगाबाद मध्ये व्हावी याकरीता सीएमआयएच्या (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर) वतीने सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. दरम्यान पिरामल फार्मा, कॉस्मो फिल्म्स या कंपन्यांनी डीएमआयसीत (ऑरिक) येथे मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या प्रकल्पांमुळे बिडकीन येथे गुंतवणूक यायला सुरवात झाली असून पुढील काळात येथे टेक्सटाईल पार्क, फूड पार्क आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय हबच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येथे आकर्षित होऊ शकते. दरम्यान याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 


उद्योजकांना आवश्यक सहकार्य करणार... 


यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, उद्योगांना आवश्यक असणारे उद्योगस्नेही वातावरण देण्याचे काम राज्य सरकार करत असून येत्या काळात औरंगाबाद आणि राज्याच्या विविध भागात मोठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येत आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


प्रलंबित प्रस्तावावर पंधरा दिवसात निर्णय घेण्याच्या निर्देश... 


पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, राज्य शासन राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल आणि ज्या ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या उपलब्ध केल्या जाईल. ज्या उद्योजकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यावर येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उद्योजकांच्या पसंतीचे राज्य आहे. त्यामुळे राज्यात उद्योगासाठी आवश्यक सुलभ वातावरण देणे, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या शक्य तितक्या कमी वेळात देणे या बाबींना आमचे प्राधान्य आहे. उद्योग समूहांकडून नव्याने प्रस्ताव आल्यास त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.