Shiv Sena Vs Shinde Group : शिवसेना आणि भाजपची युती असताना एकनाथ शिंदे यांच्यासह आलेल्या एका शिष्टमंडळाने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या याच दाव्याला आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दुजोरा दिला आहे. एवढच नाही तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागे लागले असल्याचा नवीन दावाही खैरे यांनी केला आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना खैरे म्हणाले की, जी गद्दारी एकनाथ शिंदे यांनी केली आहे ती, यापूर्वी सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. शिवसेनेचे 15 आमदार सोबत घेऊन काँग्रेसमध्ये जाण्यासाठी शिंदे यांनी खूप प्रयत्न केला होता. मात्र याबाबत शिवसेनेच्या काही नेत्यांना कुणकुण लागल्याने तो विषय थांबला होता. त्यामुळे आम्हाला तुम्ही काँग्रेससोबत गेल्याचं म्हणणारे शिंदे स्वतः काँग्रेससोबत जात होते त्याचं काय? असा टोलाही खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे.
एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते
यावेळी पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे त्यावेळी शिवसेनेचे 15 आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. याबाबत मला एकदा आमदार संजय शिरसाट म्हणाले होते की, त्याचं काही खरं नाही. शिंदे हे कधीपण कुठेही जाऊ शकतात. त्यामुळे यांच्या मनात आधीपासूनच पाप होते असेही खैरे म्हणाले.