Ashok Chavan: गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र चव्हाण यांनी या फक्त अफवा असल्याचा खुलासा देखील केला होता. मात्र यावरच आता शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठं विधान केले आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची कुजबुज सुरु असून, चव्हाण यांचे समर्थक असलेल्या आमदारानेच आपल्याला ही माहिती दिली असल्याचं सत्तार म्हणाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार...
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना अब्दुल सत्तार यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार राजूरकर यांच्याकडे मी याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी चव्हाण भाजप प्रवेशाची कुजबूज सुरू असल्याचा राजूरकर यांनीच मला सांगितले असल्याचं सत्तार म्हणाले.
मुख्यमंत्री सांगतील त्याची विकेट घेणार...
एका क्रिकेट सामान्याच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी खासदार इम्तियाज जलील यांची विकेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यावर बोलतांना सत्तार म्हणाले की, जलील यांची मी कधीही विकेट घेऊ शकतो. यापूर्वी देखील मी जलील यांच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची लोकसभा निवडणुकीत विकेट घेतली होती. तर माझा रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, त्यांनी सांगितले त्याची विकेट मी शंभर टक्के घेणार असं सत्तार म्हणाले.