Chandrakant Khaire On Arjun Khotkar: माजी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी गंभीर आरोप केले आहे. अर्जुन खोतकर यांना कोट्यवधी रुपयांचे टेंडर (Tender) मिळाले असल्याने त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा गौप्यस्फोट खैरे यांनी केला आहे. तर सोन्याची अंडी देणारी मार्केट कमिटी (Market Committee) आपल्या ताब्यात राहावी म्हणून खोतकरांनी असा निर्णय घेतला असल्याचं देखील खैरे म्हणाले. जालना येथे ठाकरे गटाच्यावतीने शेतकरी दिंडी यात्रा काढण्यात आली असून, यावेळी बोलतांनी खैरेंनी हे आरोप केले आहेत. 


यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, नॅशनल हेरॉल्डच प्रकरण आजही सुरू आहे. अनेक सरकार बदलल्या तरीही या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की, आम्ही मजेत आहोत तर तसं होणार नाही. तुमची देखील संपूर्ण चौकशी होणार. खोके कुठे गेले, कोणाच्या घरी गेले या संपूर्ण खोके प्रकरणाची आम्ही चौकशी करू असेही खैरे म्हणाले. तर अर्जुन खोतकर यांना खोके मिळाले नाही, मात्र त्यांना कोट्यवधी रुपयांचे टेंडर मिळाले आहे. तसेच जालन्याची सोन्याची अंडी देणारी कोट्यवधी रुपयांची मार्केट कमिटी देखील आपल्याला हवी आहे म्हणून खोतकर शिंदे गटात गेले असल्याचं खैरे म्हणाले. 


खोतकर-दानवे आतून एकत्रच...


पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद वरवरचं असून ते दोघेही आतून मात्र एकत्र आहेत. हे दोन्ही नेते नेहमी आतून मिळालेले आहे. अर्जुन खोतकर यांना मी नेहमी म्हणायचो की, मी तुमच्या लोकसभेचा प्रचार करायला लागतो. तुम्ही तयार व्हा असे अनेकदा त्यांना म्हणायचो आणि त्यांनी हा म्हंटल्याने आम्ही प्रचार सुरु केला. मात्र त्यांनी पलटी मारली. त्यामुळे खोतकर आणि दानवे यांच्यात ऍडजस्टमेंटचं राजकारण असल्याची टीकाही खैरे यांनी यावेळी केली. 


'मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी'


रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांच्या जालन्यात शिवसेनेचा एल्गार पाहायला मिळाला असून, ठाकरे गटाकडून शेतकरी संवाद पायी दिंडीचे जालना जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. 'मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी' असे घोषवाक्य या दिंडीला देण्यात आले आहे. तर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थित या पायी दिंडीला प्रारंभ करण्यात आला. ठाकरे गटाची ही शेतकरी संवाद पायी दिंडी जालना जिल्ह्यात गावागावात पोहचणार आहे. ज्यात युवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात ठाकरे गटाच्या सेनेला मजबूत करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.