Balasaheb Thorat On Shinde Group: शिंदे गटाचे काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटात सहभागी होणार असल्याचे बोलले जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना, या सरकारमध्ये नक्कीच गडबड असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहे. तर ज्या पद्धतीने सरकार चालत आहे, त्यामुळे शिंदे गटातील लोकांच्या मनात नैराश्य असल्याचं माझं देखील मत असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


यावेळी बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्य सरकार बनले कसं, सरकार झालं कसं, जनसामन्य माणसामध्ये त्यांच्याबद्दल काय मत आहे, हे पुन्हा-पुन्हा सांगायची गरज नाही. आधी तर सरकार बनत असतांना मंत्रीमंडळ बनायला तयार नाही, मंत्रीमंडळ झालं तर मंत्र्यांना खाते मिळत नव्हते आणि खाते मिळाल्यावर पालकमंत्री यांच्या नियुक्तीला उशीर असं सर्व काही पाहायला मिळत आहे.  दिल्लीच्या वाऱ्या करता-करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थकून गेले. त्यामुळे कोण काय बोलतोय,कोण काय करतोय कळतचं नसल्याचा टोला थोरात यांनी लगावला. 


बांधावर जाण्याची मंत्र्यांची हिम्मत नाही... 


पुढे बोलतांना थोरात म्हणाले की, खरं म्हणजे सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष असले पाहिजे, पण यांचं बिलकुल याकडे लक्ष नाही. राज्याचे प्रकल्प पळवून नेले जात आहे. मात्र त्याला उत्तर द्यायचे म्हणून काहीतरी उलटे आरोप करायचे असं चाललं आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार झाला आहे. सोयाबीन पूर्णपणे गेले असून, पीके पाण्यात आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. पण अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तर काही ठिकाणी कृषी अधिकारी पंचनामे करण्यासाठी पैसे मागत असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे जितक्या काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, त्याप्रमाणे दुर्दैवाने दिले जात नाही. काय सुरु आहे हे जनतेला देखील समजत आहे. अनेक मंत्री नुकसानीच्या पाहणीसाठी जात नाही. कारण जनतेच्या समोर जाण्याची हिम्मत त्यांच्यामध्ये नसून, जनतेमध्ये रोष असल्याचं थोरात म्हणाले. 


आमच्याकडे पैसेचं नसल्याचं सरकराने स्पष्ट सांगावे...


ओला दुष्काळ करण्याबाबत सरकारकडे पैसा नसल्याचं बोलले जात आहे, यावर बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मग सरकारकडे पैसा नाही हे एकदा त्यांनी जाहीर तरी करून टाकले पाहिजे. त्यांनी पैसेच नसल्याचं स्पष्ट केले तर लोकं देखील म्हणतील जाऊ द्या आता सरकारकडे पैसे नाहीत त्याला काय ईलाज नाही. सरकार दिवाळखोरीत आहे का? याबाबत त्यांनी सांगावे, जनतेला मदत मिळणे महत्वाचे आहे. आता ती मदत कशी द्यायची याबाबत त्यांनी ठरवावे असेही थोरात म्हणाले. 


विमा कंपन्या पूर्णपणे नफा खोरीकडे वळाल्या...


अलीकडील काळात विमा कंपन्या पूर्णपणे नफा खोरीकडे वळाले असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना जी नुकसानभरपाई दिली पाहिजी ती दिली जात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार असतांना आम्ही बीड पॅटर्न सुरु केले होते. मात्र केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली नाही. अन्यथा सरकार,कंपनी आणि शेतकरी तिघांना मदत होऊ शकली असती. त्यामुळे नुकसान झाल्यावर त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळायलाच पाहिजे असे थोरात म्हणाले.