Ajit Pawar On Sanjay Shirsat: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला असून, अजूनही अनेकजणांना मंत्रीपदाची अपेक्षा  आहे. पण असे असतानाच मंत्रिमंडळ विस्तार सतत लांबणीवर पडत आहे. दरम्यान याच मंत्रीमंडळ विस्तारावरून औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना खोचक टोला लगावला आहे. औरंगाबादला मंत्रीमंडळात मोठ्याप्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले असून, अजूनही अनेकजण सूट शिवून बसले असल्याचा खोचक टोला पवारांनी लगावला आहे. 


मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांच्याकडून आज अर्ज दाखल करण्यात आहे. दरम्यान अजित पवारांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र त्यापूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीत प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना पवारांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. औरंगाबाद शहराला 8 ते 15 दिवसांनी पाणी येते याचे आश्चर्य वाटते. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरीसुद्धा पाणी मिळत नाही. आत्ताच्या मंत्रीमंडळात औरंगाबादला मोठ्याप्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले आहे. तर अजूनही मिळणार आहे. सगळेजणच सूट शिवून तयार बसले असून, कधी निरोप येतो याची वाट पाहत आहे. आता तीन मंत्रीपद मिळाले आहे. 20 लोकांमध्ये तीन मंत्रिपद फक्त एकट्या औरंगाबाद जिल्ह्याला मिळाले असल्याचं पवार म्हणाले. 


आपापल्या पक्षातील वाचाळवीरांना थांबवा! 


पुढे बोलतांना पवार म्हणाले की, राज्यात समाधानकारक वातावरण नाही. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या पाहताना, काय बोलावे याचे भान राहिले नसल्याचं दिसून येत आहे. काही लोकांच्यामुळे सगळेच एकाच माळेचे मनी वाटतात. कोणी कुणालाही काहीही बोलत आहे. हे सर्व पाहून वाईट वाटत आहे. आम्ही सुद्धा 32 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. सगळ्यांनी महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे. सगळ्या पक्षातील वाचाळवीरांना थांबवण्याची गरज आहे. आम्ही आमच्या पक्षात याबाबत नोंद घेऊ, इतरांनीही घ्यावी. जेणेकरून गढूळ वातावरण कमी होईल असेही अजित पवार म्हणाले. 


अजित पवार पोहचले रुग्णालयात 


औरंगाबाद दौऱ्यावर असलेले अजित पवार आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान औरंगाबादच्या चिखलठाणा विमानतळावर पोहचले. मात्र विमानतळावरून त्यांनी आपला ताफा थेट शहरातील सिग्मा हॉस्पिटलकडे वळवला. यावेळी त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भेट घेऊन, प्रकृतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हल्ला झाला होता. ज्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यामुळे अजित पवारांनी शहरात येताच सर्वात आधी ततरमळे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता