ABP Majha Impact: परतीच्या पावसाने मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, काढणीला आलेले पीक मातीमोल झाले आहे. दरम्यान अशाच काही औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवली होती.'एबीपी माझा'च्या याच बातमीची राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दखल घेतली आहे. तर कृषिमंत्री सत्तार यांनी गंगापूर तालुक्यातील चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन आर्थिक मदत केली आहे. तसेच सरकार लवकरच राज्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत देखील करणार असल्याचे आश्वासन देखील दिले आहे.
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाला आहे. दरम्यान याच गावातील ऋषिकेश चव्हाण नावाच्या चिमुकल्याला दिवाळीसाठी कपडे घेणे सुद्धा अवघड झाले असल्याचे चित्र 'एबीपी माझा'नं दाखवलं होतं. 'एबीपी माझा'च्या याच बातमीची दखल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली असून, शुक्रवारी रात्री कृषीमंत्र्यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अब्दुल सत्तार यांनी चव्हाण कुटुंबीयांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच लवकरच शासकीय मदत देण्याची आश्वासन देखील दिले.
चव्हाण कुटुंबीयांची दिवाळी गोड...
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीने चव्हाण कुटुंबीयांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा राहिला होता. दरम्यान कृषिमंत्री यांनी एबीपी माझाची बातमी पाहिल्यानंतर चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. यावेळी अब्दुल सत्तार यांनी या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीसाठी नवीन कपडे घेऊन दिले. सोबतच 50 हजार रुपयांची रोख मदत ही केली. तर लवकरच शासकीय मदत देखील खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले. तर याचवेळी अब्दुल सत्तार यांनी 'एबीपी माझा'ने शेतकऱ्यांच्या व्यथा दाखवल्याबद्दल आभार व्यक्त केले.
उद्धव ठाकरेंचा चव्हाण कुटुंबीयांशी फोनवरून संवाद
दरम्यान एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील ऋषिकेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. आम्ही सर्व तुमच्या सोबत असून, संकट निघून जाईल असे म्हणत धीर दिला. तसेच आमच्याकडून जे काही शक्य होईल त्या पद्धतीने मदत करू असे आश्वासन देखील दिले.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी