Aurangabad News: मराठवाड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकरी हतबल झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील अशाच एका बुट्टेवडगाव गावातील चव्हाण कुटुंबातील व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवली होती. माझाच्या या बातमीनंतर औरंगाबादच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महाराष्ट्रातून मदतीचा हात मिळत असून, त्यांची दिवाळी गोड झाली आहे. कालपासून चव्हाण कुटुंबातील सदस्यांना राज्यभरातून मदत मिळत आहे. 


औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव परिसरात ढगफुटीसुदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतात गेल्या चार दिवसांपासून पाणी तुंबले आहे. पीक पाण्याखाली गेल्याने दिसेनाशी झाली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. दरम्यान 'एबीपी माझा'ने  बुट्टेवडगावातील शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्राला दाखवल्या होत्या. ज्यात ऋषिकेश चव्हाण नावाच्या चिमुकल्याने आपल्याकडे पैसे नसल्याने दिवाळीसाठी कपडे घेता येणार नसल्याची व्यथा बोलावून दाखवली होती. एबीपी माझाची ही बातमी महाराष्ट्रभरात व्हायरल झाली आणि चव्हाण कुटुंबाच्या मदतीला अनेक हात धावून आले आहे. 


ऋषिकेश डोळ्यात पाणी...


शेतातील नुकसान वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहता यावर्षी दिवाळी साजरी होणार नसल्याचे  ऋषिकेशला वाटले होते. त्यामुळे आपण कपड्यांचा हट्ट केला नसल्याचं ऋषिकेश म्हणाला होता. मात्र माझाच्या बातमीनंतर कालपासून चव्हाण कुटुंबाला राज्यभरातून मदत मिळत आहे. आज जेव्हा 'एबीपी माझा'ची टीम ऋषिकेशच्या घरी गेली तेव्हा बोलतांना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात देखील पाणी आले.


Abdul Sattar : सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही, वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश, कृषीमंत्र्यांची माहिती


'एबीपी माझा'चं आवाहन...


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला असून, त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्यातील गावागावात अनेक ऋषिकेश असून, त्यांना देखील मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही आपली दिवाळी साजरी करतानाच शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन 'एबीपी माझा'च्या वतीने करण्यात येत आहे.