Aurangabad News: औरंगाबाद दौऱ्यावर असलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहे. सोबतच शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहे. आदित्य ठाकरे यांनी काल सिल्लोडमध्ये नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा घेतला. दरम्यान श्रीकांत शिंदे आणि अब्दुल सत्तार यांची देखील सिल्लोडमध्ये सभा झाली, ज्यातून त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यामुळे आज आदित्य ठाकरे त्यांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहे. आज आदित्य ठाकरे पैठण तालुक्यातील डोणगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती सुद्धा घेणार आहे. दरम्यान बालानगर या गावात आदित्य ठाकरेंचा संवाद मेळावा देखील होणार आहे. यासाठी स्टेज देखील उभारण्यात आला आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा मेळावा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे आक्रोश मेळाव्यात सहभागी होणार...
औरंगाबादच्या पंढरपूर परिसरात आज ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या मेळाव्यात आदित्य ठाकरे स्वतः सहभागी होणार आहे.शिंदे-फडणवीस सरकारच्या योजना,शेतकरीप्रश्न, ओला दुष्काळ आणि विकास कामांवरून आदित्य ठाकरे निशाणा साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आक्रोश मेळाव्यातून आदित्य ठाकरे कोणावर हल्लाबोल करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
यामुळे गाजतोय आदित्य ठाकरेंचा दौरा...
आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत आला आहे. दोन नंबरचा पप्पू म्हणून उल्लेख करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सिल्लोड मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा घेण्याचं नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आलं होतं. मात्र ज्या दिवशी आदित्य ठाकरे सभा घेणार होते, त्याच दिवशी सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली. त्याजागी आदित्य ठाकरेंनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने सामने आल्याने आदित्य ठाकरे यांच्या दौरा चर्चेत आला आहे.
आदित्य ठाकरे यांचा आज दिवसभरातील दौरा...
- सकाळी 10:30 वाजता औरंगाबाद पंढरपूर (बजाज नगर) येथे आक्रोश मेळावा.
- सकाळी 11:30 वाजता पैठणच्या डोणगाव येथे अतिवृष्टी नुकसान पीक पाहणी करणार.
- दुपारी 12 वाजता पैठणच्या बालानगर येथे शेतकरी संवाद
- दुपारी 01 वाजता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोरी गंधारी येथे अतिवृष्टी पीक नुकसान पाहणी करतील.
- दुपारी 02 वाजता पाडळसीगी (ता. गेवराई, जि. बीड) अतिवृष्टी पीक नुकसान पाहणी करणार
- दुपारी 02.45 वाजता चौसाळा (जि.बीड) शेतकऱ्यांशी संवाद साधतील
- दुपारी 04 वाजता भुम धाराशीव (जि.धाराशीव) अतिवृष्टी नुकसान पीक पाहणी करणार.
- दुपारी 05:15 वाजता पारगाव (ता. वाशी, जि. उस्मानाबाद) शेतकऱ्यांशी संवाद साधतील