Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून, वैजापूर शहरातील एका चारचाकीच्या  शोरूमला भीषण आग लागली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे. घटनास्थळी वैजापूर पोलीस दाखल झाले असून, नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तर याबाबत अग्निशमन दलाला देखील माहिती देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. 


याबाबत स्थनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील स्टेशन रोड परिसरातील सेंट मोनिका शाळेसमोर असलेल्या मारुती सुझुकी शोरुमल आहे. दरम्यान आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या शोरूमला अचानक आग लागली. आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. तर पाहता पाहता शोरूमच्या खिडकीतून मोठा धूर आणि आगीचे लोंढे बाहेर पडतांना पाहायला मिळाले. तर चारचाकी गाड्यांच्या शोरूमला आग लागल्याची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.


दरम्यान यावेळी शोरूमला लागेलेली आग विझवण्यासाठी उपस्थित नागरिक प्रयत्न करत आहे. विक्रीसाठी शोरूममध्ये नवीन पाच ते सहा गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयन्त केले जात आहे. मात्र आग एवढी भीषण आहे की, शोरूममधील सर्वच वस्तू जळून खाक झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शोरूममध्ये ठेवलेल्या ऑईलच्या ड्रमने पेट घेतला आहे. सोबतच आतमध्ये असलेले टायर देखील जळून खाक झाले आहेत. सोबतच आतमध्ये काही मशनेरी देखील होत्या, त्यांना सुद्धा आग लागल्याचे बोलले जात आहे. 


अग्निशमन दल दाखल...  


घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर अग्निशमन दलाकडून आता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र आग भीषण असल्याने आणि आतमधील ऑईलच्या ड्रमने पेट घेतल्याने यासाठी उशीर लागत आहे. सोबतच घटनास्थळी खाजगी पाण्याचे टॅकर बोलवण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान काही तासाने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश असल्याचे देखील समोर येत आहे. मात्र यात नेमकं काय-काय जळाले याबाबत अधिकृत माहिती आणखी समोर येऊ शकली नाही. 


आगीचे कारण अस्पष्ट... 


वैजापूर शहरातील स्टेशन रोड परिसरातील सुझुकी कंपनीच्या शोरूमला आज सकाळी अचानक लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. बंद असलेल्या शोरूममध्ये आग कशी लागली याबाबत पोलीस तपास करत आहे. तर या घटनेची नोंद वैजापूर पोलिसात करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतरचं आगीचे कारण कळू शकणार आहे.