Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) चांगलीच आक्रमक झाली आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात जलसमाधीआंदोलन करण्यासाठी एक हजार शेतकऱ्यांसह तुपकर आज मुंबईकडे रवाना होणार आहेत. उद्या (24 नोव्हेंबर) हे आंदोलन होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता शेतकऱ्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे.


बुलढाण्यातून  60 ते 70 गाड्यांचा ताफा मुंबईकडे निघणार


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आज एक हजार शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अरबी समुद्रात ते शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत. 60 ते 70 गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून सकाळी साडेनऊ वाजता मुंबईच्या जिशेनं रवाना होणार आहे. या ताफ्यात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील होणार आहेत. बुलढाण्याहून हा ताफा बुलढाणा -सिल्लोड -औरंगाबाद - नगर - पुणे मार्गे जाऊन मुंबईजवळ वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करुन २४ नोव्हेंबरला सकाळीच मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात जलसमाधी घेण्यात येणार आहे. हे आंदोलन करु नये म्हणून बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना आधीच नोटीस बजावली आहे.  या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस दलाच एक पथक मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.


नेमक्या काय आहेत मागण्या


सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8 हजार 500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रती क्विंटल 12 हजार 500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारनं धोरण आखावं. सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन देऊन 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा.  खाद्यतेलावर 30 टक्के आयात शुल्क लावा. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करा. शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे. जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना कंपाऊंड लावून द्या यासह इतर मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत. सरकारनं सोयाबीन, कापूस आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केल्यामुळे रविकांत तुपकर यांनी अरबी समुद्रात हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Beed News : सरकारने कितीही दबाव आणला तरी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणारच, रविकांत तुपकर यांचा पुनरुच्चार