Railway Mega Block: मध्य रेल्वेमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते कल्याण स्थानकादरम्यान तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान लाइन ब्लॉक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेने नांदेड विभागात धावणाऱ्या तपोवन, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी, देवगिरी एक्सप्रेस काही दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. त्यामुळे 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान नांदेडहून मुंबईकडे आणि मुंबईहून नांदेडकडे धावणाऱ्या 12 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर याचा फटका मराठवाड्यातील प्रवाशांना बसणार आहे.
कोणत्या रेल्वे रद्द झाल्या आहेत...
तपोवन एक्सप्रेस 20 नोव्हेंबर रोजी, तर नांदेडहून मुंबईकडे धावणारी एक्स्प्रेस 19 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस 20 नोव्हेंबरला रद्द करण्यात आली आहे. नंदिग्राम एक्स्प्रेस 20, तर आदिलाबाहून मुंबईकडे जाणारी 21 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच राज्यराणी एक्स्प्रेस 20 नोव्हेंबर, तसेच मुंबईकडे जाणारी 19 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. राज्यराणी पाठोपाठ मुंबई- सिकंदराबाद धावणारी देवगिरी एक्सप्रेस 20 तर सिकंदराबाद- मुंबई दरम्यान धावणारी 19 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. याच बरोबर आदिलाबाद-मुंबई 19 नोव्हेंबर रोजी दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील प्रवाशांना फटका...
रेल्वे प्रशासनाने मेघा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतल्याने औरंगाबादहून जाणाऱ्या 12 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका मराठवाड्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. कारण यातील अनेक एक्स्प्रेस या नांदेडहून मुंबई अशा धावतात. त्यामुळे नांदेड, जालनासह औरंगाबाद येथील अनेक प्रवाशी यातून प्रवास करत असतात. मात्र 19,20 आणि 21 नोव्हेंबर रोजीच्या रद्द करण्यात आलेल्या रेल्वेमुळे याचा फटका मराठवाड्यातील प्रवाशांना बसणार आहे.
औरंगाबादहून नागपूरसाठी देखील ट्रॅव्हल्सचाच पर्याय...
औरंगाबादहून नागपूरला जायचे असेल तर सध्या ट्रॅव्हल्स आणि एसटी बसशिवाय पर्यायच उरला नाही. कारण कोरोनाकाळात तीन रेल्वेंची नागपूर कनेक्टिव्हिटीच तुटली असून, अद्याप ती सुरु करण्यात आलेली नाही. कोरोनात सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्याने नंतर रेल्वे सुरू केल्या. या सगळ्यात नागपूर- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरऐवजी आदिलाबादहून सुरू करण्यात आली. कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस ही रेल्वे 19 फेब्रुवारी 2021 पासून लातूरमार्गे वळविण्यात आली. तर अजनी-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस अजूनही रुळावर आलेली नाही. त्यामुळे औरंगाबादहून नागपूरला जायचे असेल तर प्रवाशांना ट्रॅव्हल्स, एसटी बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरला नाही.