Pune Crime News : खाणीत तोल जाऊन पडल्याने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. ऋतिका काळे असे 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे. सुनील महाजन, तुळशीराम महाजन दोघांची ही खाण होती. पोल्ट्रीतील कचरा टाकण्यासाठी गेली असता तिचा तोल गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. कल्याणी जयवंत काळे (वय 38 वर्षे) यांनी यासंर्दभात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागात असणाऱ्या भिलारेवाडी येथे ही खाण आहे. या परिसरात नागरिकांकडून कचरा टाकण्यात येतो. ऋतिका कचरा टाकण्यासाठी खाणीच्या परिसरात गेली होती. त्यावेळी तोल जाऊन ती खाणीत पडल्याने आणि तिला जबर मार लागला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. खाणीच्या परिसरात कठडे नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे ऋतिकाच्या आईने सांगितले. सुरक्षेसाठी खाणीच्या कडेला कोणतेही कम्पाऊंड नसल्याने तसेच उपाययोजना न केल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याने खाण मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.


खाणीला कम्पाऊंड नसल्याने घसरला पाय
सुनील महाजन, तुळशीराम महाजन हे दोघे या खाणीचे मालक आहेत. त्यांच्या खाणीला कोणत्याही प्रकारचं सुरक्षाकवच किंवा कम्पाऊंड नाही. भिलारेवाडी परिसरात खाण आहे. खाणीच्या परिसरात योग्य उपाययोजना करणं आणि कठडे बांधणं ही मालकाची जबाबदारी असते मात्र त्यांनी कठडे बांधले नव्हते. कठडे नसल्याने अनेकदा भीती व्यक्त केली होती. मात्र तरी देखील त्यांनी कठडे बांधले नव्हते. हे कठडे नसल्याने ऋतिकाला जीव गमवावा लागला. 


कठडे नसल्याने पोकलेन थेट खाणीत पडले; एकाचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील मोई गावात पोकलेन घसरुन दगड खाणीतील पाण्यात पडले होते. पोकलेन मशिनच्या केबिनमध्ये असलेल्या ऑपरेटरला बाहेर पडताच आले नाही. त्यामुळे या पोकलेन मशिनचा ऑपरेटरचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाळुंगे पोलिसांत या अपघाताची नोंद करण्यात आली होती. अनिल दिगांबर कालासरे असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पोकलेन मशिनच्या ऑपरेटरचे नाव होतं. सकाळी ऑपरेटर नेहमीप्रमाणे खाणीत कामासाठी जात असताना पोकलेन मशिन खाणीत घसरले. यावेळी पोकलेन मशिनच्या केबिनचे दरवाजे बंद असल्याने ऑपरेटर कालासरे याला बाहेरच पडता आले नाही, त्यातच त्याचा मृत्यू झाला.