Marathwada Teacher Constituency Election: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी (Vote Counting) 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून, 1 फेब्रुवारी रोजी मतमोजणीच्या ठिकाणीच दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 86.1 टक्के मतदान झाले आहे. 


शिक्षक मतदारसंघासाठी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांत एकूण 53 हजार 257 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 56 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी 700 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची सुरूवात सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे. सुरूवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर 25 मतपत्रिकेचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिकांचे सरमिसळ करण्यात येईल. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मताप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल.


अशी करण्यात आली आहे तयारी... 


मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष,  केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनीदेखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थाबावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


असा रंगणार सामना...


मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहे. त्यासाठी 30 जानेवारीला मतदान झाले असून, एकूण 86.1 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान निवडणूकीत 14 उमेदवार असले तरीही खरी लढत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आणि भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात होणार आहे. गेल्या अठरा वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व विक्रम काळे करत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून यंदा जोरदार प्रयत्न करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार याचा निकाल 2 फेब्रुवारीलाच समोर येणार आहे. तर या निकालाकडे संपूर्ण मराठवाड्याकचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 86 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात