Waqf Board: महाराष्ट्र वफ्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर होत असलेल्या खोटे आरोपांमुळे मोठा मनस्ताप होत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्याक विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अनिस शेख यांना कार्यमुक्त करण्याबाबत पत्र लिहले होते. तसेच अनिश शेख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
काय म्हणाले अनिस शेख....
आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिस शेख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हंटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून माझ्याविरुद्ध सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणावर माझी बदनामी करणाऱ्या आणि खोट्या बातम्या येत आहेत. अनेक व्हिडिओ,ऑडीओ क्लिप व्हायरल केल्या जात आहे. या सगळ्यांना मी कंटाळलो आहे. जे कामे मी केली नाहीत त्याचे आरोप माझ्यावर केले जात आहे. अशा परीस्थीतीत या पदावर राहणे माझ्यासाठी कठीण झाले आहे. त्यामुळे आज मी माझ्या पदाचा राजीनामा सरकारकडे पाठवून दिला असल्याची माहिती अनिस शेख यांनी दिली आहे.
आव्हाडांनी दिले होते कार्यमुक्त करण्याचे आदेश...
नवाब मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक विभाग जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात आव्हाड यांनी अल्पसंख्याक विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अनिस शेख यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. यावेळी आव्हाड पत्रात म्हणाले होते की, अनिस शेख हे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वक्फ बोर्ड या पदावर कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळामध्ये वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनींची अवैधरित्या विक्री झालेली आहे. विशेषतः वक्फ बोर्डाच्या जमिनी या सार्वजनिक वापराकरिता राखीव असतांना त्या जमिनीसंदर्भात अनिस शेख यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने अनधिकृतपणे विक्री व्यवहार झालेले आहेत.
वक्फ जमिनी या वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असून त्या जमिनींचा धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीचा काहीही संबंध नसतांना सदर जमिनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंद आहेत, असे दर्शवुन बरेच विक्री व्यवहार झालेले आहेत. महसुल विभागाच्या शासन निर्णयानुसार सातबा-यावर वक्फ जमिनींची प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद असणे आवश्यक आहे. तथापि अशी नोंद नसल्याने वक्फ बोर्डाच्या जमिनी या अन्य नावाने नोंद झाल्या.
त्यामुळे या सर्व जमिनींचा आढावा घेऊन त्या जमिनींची सातबा-यावर प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद करुन घेण्याबाबत अनिस शेख यांना वारंवार निर्देश देऊनसुध्दा त्यांनी याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून या संपूर्ण जमिनी व्यवहारांची शेख यांची चौकशी करण्यात यावी. तत्पुर्वी अनिस शेख यांना मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरुन तात्काळ कार्यमुक्त करुन तसा अहवाल सादर करावा,असे आव्हाड यांनी अल्पसंख्याक विभागाच्या मुख्य सचिवांना लिहलेल्या पत्रात म्हटले होते.