Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील मोंढानाका परिसरातील एका गोडाऊनमध्ये कामाला असणाऱ्या सुरक्षारक्षकाचे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. त्यानंतर औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 72  तासांत आरोपीचा छडा लावून, त्यांना ताब्यात घेतले आहे. यासाठी पोलिसांनी 800 किमी प्रवास करत 6 जिल्ह्यात आरोपीचा शोध घेतला. ज्यात पोलिसांनी 275 पेक्षा जास्त वाहनाची तपासणी करत 950 पेक्षा अधिक CCTV कॅमेरे तपासात मुंबईतुन आरोपींना अटक केली. 


औरंगाबादच्या मोंढानाका परिसरातील बालाजी एन्टरप्राईजेस बिडी सिगारेट गोडाऊन सुरक्षारक्षक म्हणून पाशा अफजल मुगल (वय 70 वर्ष, रा. मोंढानाका, औरंगाबाद) कामाला होते. दरम्यान 26 ऑक्टोबरला रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमध्ये घुसून चोरी केली. यावेळी त्यांना अडवणाऱ्या पाशा मुगल यांचे खुर्चीला हातपाय बांधुन तोंड व नाकाला आवळुन त्यांचा चोरट्यांनी खुन केला. त्यानंतर गोडाऊनचे शटर उचकटुन त्यामधील कोंबडा बिडी पोते, अशिर्वाद आटा बॅग, कश्मिरी सौफ बॅग असा 3  लाख 44 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


अन् आरोपींची ओळख पटली... 


गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत, पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पथकांना मार्गदर्शन करत तपासाच्या सूचना केल्या. दरम्यान घटनास्थळापासून पोलिसांनी CCTV तपासायला सुरवात केली. ज्यात वाहनाची ओळख पटवून गुन्हेगारांचा शोध सुरु केला. पोलिसांनी 800 किलोमीटरचा प्रवास करून वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने 6 जिल्ह्यात आरोपींचा शोध घेतला. दरम्यान या काळात पोलिसांनी तब्बल 275 वाहनांची पडताळणी केली. दरम्यान 950 CCTV तपासले. यावेळी अखेर आरोपी मुंबई आणि धुळ्यात असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. 


तीन जिल्ह्याच्या पोलिसांच्या मदतीने आरोपी अटक...


आरोपींची खात्री होताच पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने मुंबई, मिराभाईंदर व धुळे पोलीसांच्या मदतीने आरोपींना बेड्या ठोकल्या. ज्यात सलीम अहमद जब्बार अहमद अन्सारी (वय 47 वर्ष, धंदा चालक, रा. रुनं जानकी मंदीर जवळ, तारगल्ली, साकीनाका, मुंबई), मुबारक अली बिलाल अली (वय 35 वर्ष रा. नालासोपारा, ता.जि वसई विरार, जि पालघर) यांना मुंबई येथुन ताब्यात घेतले. तर मोहम्मद इब्राहीम मोहम्मद चौधरी (वय 31 वर्ष, रा. चाळीसगाव रोड, मुल्लागल्ली, धुळे) यास धुळे येथून ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन, चोरी केलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे.