Osmanabad Cyber Crime News : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. बनावट फोन कॉल (Fake Phone Calls) करुन बँक खात्यातून (Bank Account) सहजपणे पैसे लांबवले जात आहे. आता असाच काही प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) तुळजापूर शहरात समोर आली आहे. एका बनावट कॉलद्वारे वीज तोडण्याची धमकी देऊन तुळजापूर शहरातील आपसिंगा रोड भागात वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीचे 30 हजार 975 लांबवण्यात आले आहेत. प्रकाश भगवान साळवी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर शाखेकडून तपास सुरु आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, बनावट फोन कॉल करुन महावितरणचा कर्मचारी असल्याचे भासवून एका भामट्याने साळवी यांना त्यांच्याकडे वीज बिल थकल्याचे सांगितले. हे बिल भरा, अन्यथा घराची वीज तोडू, असा दमही त्याने भरला. घराचा वीजपुरवठा खंडित होईल, या भीतीने साळवी यांनी फोन करणाऱ्या भामट्यास प्रतिसाद दिला. तर हे बिल ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून, त्यासाठी बिल अपडेट करावे लागेल, असे सांगून त्याने काही मेसेज पाठवले. शिवाय, यावर त्याने सांगितल्याप्रमाणे साळवी यांनी प्रतिसाद दिला.


भामट्याने खात्यावरील रक्कम पळवली... 


आपली वीज बंद होईल म्हणून, साळवी यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे मॅसेज उघडून पुढील प्रक्रिया केली. दरम्यान, काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून 30 हजार 975 रुपये गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खातरजमा केली असता भामट्याकडून त्यांच्या खात्यातील रक्कम पळवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी तुळजापूर पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मदतीने सायबर क्राईम शाखेकडे साळवी यांची तक्रार वर्ग करण्यात आली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करत सायबर शाखेने तपास सुरू केला आहे.


फ्रॉड कॉलपासून सावध रहावे


वेगवेगळी आमिषे दाखवून ऑनलाईन गंडवण्याचे प्रकार सद्या सर्वत्र घडताना दिसून येत आहे. कधी फोन पे, तर कधी बँक खाते अपडेट करण्याचे आमिष दाखवले जातात. यामध्ये आता वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन गंडा घालण्याच्या प्रकाराचीही भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांना बळी पडू नये, फ्रॉड कॉलपासून सावध रहावे, असे आवाहन पोलिसांकडून सतत करण्यात येत आहे. मात्र असे असले तरीही अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे फसवणूक होणाऱ्या लोकांमध्ये सुशिक्षित लोकांचा देखील मोठा समावेश आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Nanded News: अनोळख्या लिंकवर क्लिक करताच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या खात्यातून साडेपाच लाख गायब, नांदेडमधील घटना