मुंबई :  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)  6 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेसाठी काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून माहिती देण्यात आली.  परंतु प्रकृती प्रकृती ठीक नसल्यामुळे शरद पवार भारत जोडो यात्रेल उपस्थित राहणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर  शरद पवार 8 नोव्हेंबरला  भारत जोडो यात्रेत  सहभागी होणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे या यात्रेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


एकीकडे राहुल गांधी  भारत जोडो यात्रेतून  महाराष्ट्राच्या दिशेने कूच करत आहेत. 48 तासात राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.  महाराष्ट्र  कॉंग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. कॉंग्रेस नेतेही  रोजच्या रोज भल्या पहाटे उठून सराव करत आहे. पण सध्या कॉंग्रेस सोडून महाविकासआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणते प्रमुख नेते  या यात्रेमध्ये सामील होणार या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न्युमोनिया झाल्यामुळे छातीत मोठया प्रमाणत संसर्ग झाला आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिराला ऑनलाईन सहभागी झाले होते. सध्या पवार यांची तब्येत पाहता ते रॅलीत सहभागी होणार नाही अशी  शक्यता  वर्तवण्यात आली होती. परंतु  समोर आलेल्या माहितीनुसार ते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शिर्डीत पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल त्यांनी रुग्णालयातूनच ऑनलाईन सहभाग घेतला होता. आज ते हेलिकॉप्टरने शिर्डीला जातील आणि तिथं राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सहभागी होऊन मुंबईत परततील. मुंबईत दाखल झाल्यानंतर ते पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होणार असल्याची आहे.


 तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती बाबत सांशक्ता निर्माण झाली आहे.  31 ऑक्टोबरपासून उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांच आयोजन केलं आहे. प्रत्येक दिवशी एका जिल्ह्यासाठी वेळ दिला असून या बैठका 14 नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रेसाठी ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता फारच कमी आहे, अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शिवसेना आमचा पारंपरिक मित्रपक्ष नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केले. 


राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशात विरोधी पक्षांची व्रजमूठ दाखवण्याची संधी महाविकास आघाडीला प्राप्त झाली आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना प्रमुख पक्षातील दोन दिग्गज नेते यांच्या रॅलीतील उपस्थिती वरूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आणि नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी तर नाहीं ना अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. 


संबंधित बातम्या :


Bharat Jodo Yatra : पोलिसांनी संयमाने वागावे, अशी धक्काबुक्की योग्य नाही; हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच माजी मंत्री राऊत यांची पहिली प्रतिक्रिया