Aurangabad Crime News: नागपूर सीमेवर एका ट्रकमधून सुमारे 1500 किलो गांजा जप्त करण्याच्या कारवाईला काही तास उलटत नाही तो औरंगाबादमध्ये देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांजाची मोठी कारवाई केली आहे. एका कापसाच्या शेतातून तब्बल 66 लाखांचा 630 गांजा पकडला आहे.याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  रामभाऊ अमृता तांदळे (रा. गणोरी ता. फुलंब्री), सुखलाल फंदुसिंग जंगाळे (रा. निधोना ता. फुलंब्री) कारभारी शामलाल गुसिंगे (रा. निधोना ता. फुलंब्री) असे आरोपींचे नावं आहे. 


राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फुलंब्री तालुक्यातील गणोरी आणि निधोना गावात काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गांजा लावला असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. ज्यात शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला असता, रामभाऊ तांदळे यांच्या गणोरी शिवारातील गट क्र. 24 मधील उस व कपासीचे पिकामध्ये गाजांचे आठ ते दहा फुट उंचीचे एकुण 45 झाडे ज्याचे एकुण वजन 520 कि. ग्रॅ. मिळून आले. तर सुखलाल फंदुसिंग जगांळे यांच्या मालकीच्या निधोना शिवारातील गट न. 125 मधील कापसाच्या पिकामध्ये गाजांचे सात ते आठ फुट उंचीचे एकुण 40 झाडे ज्याचे एकुण वजन 53 कि.ग्रॅ. आढळून आला. सोबतच शेतात सुखलेला 10 किलो गांजा देखील मिळून आलेला आहे. 


त्याचप्रमाणे शुल्क विभागाने कारभारी शामलाल गुसिंगे यांच्या निधोना शिवारातील गट न. 119  मध्ये छापा मारला असता, कापसाच्या पिकामध्ये गाजांचे पाच ते सहा फुट उंचीचे एकुण 22  झाडे ज्याचे एकुण वजन 75  कि.ग्रॅ. मिळून आलेले आहे. त्यामुळे तिन्ही शेतकऱ्यांच्या शेतात एकूण 107 गांजाचे झाडेम ज्यांचे वजन 648 किलो व सुखलेला 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तर या कारवाईत एकूण 66 लाख 5 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे. 


नागपूर कनेक्शन असणार का? 


नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने देखील आज पहाटे कारवाई करत ओडिशामधून सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये सेंद्रिय खताच्या शेकडो पोत्यांच्या माघे ठेवलेल्या 1500 किलो गांजा जप्त केला आहे. तर याप्रकरणी बीड जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून, याचा पुरवठा बीडमध्ये करण्यात येणार होता. तर तो तिथून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवला जाणार होता का? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्यामुळे आज औरंगाबादमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा नागपूर कारवाईशी काही कनेक्शन आहे का? अशीही चर्चा पाहायला मिळत आहे. 


Nagpur Police : सेंद्रिय खतांच्या पोत्यातून गांजाची तस्करी; नागपूर सीमेवर ट्रकमधून 1500 किलो गांजा जप्त